ठाणे : ठाणे ते बोरिवली या भुयारी मार्गाच्या कामासाठी घोडबंदर येथील हावरे सिटी गृहसंकुलाजवळील परिरसरात सिमेंट काँक्रीट तयार करण्याचा (आरएमसी) प्रकल्प उभारण्यात आला आहे. परंतु सिमेंटची पावडरच्या धुलीकणांमुळे लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग, दमा, श्वासोच्छवासाच्या समस्यासह इतर आजारांचा धोका निर्माण झाला आहे. या पार्श्वभूमीवर स्थानिक रहिवाशांमधून संताप व्यक्त होऊ लागला असून हा प्रकल्प भरवस्तीतून हटविण्यासाठी रहिवाशांनी नुकतेच निषेध आंदोलनही केले आहे.

घोडबंदर येथील कासारवडवली भागात हावरे सिटी गृहसंकुल आहे. ३० पेक्षा जास्त इमारती असून त्याठिकाणी ८ हजारहून अधिक रहिवाशी राहतात. या परिसरात अनेक प्राथमिक आणि माध्यमिक शाळा आहेत. या वस्तीच्या परिसरातच सिमेंट काँक्रीट तयार करण्याचा प्रकल्प उभारण्यात आला आहे. ठाणे ते बोरिवली असा भुयारी मार्ग उभारण्यात येत आहे. या मार्गाच्या कामासाठी हा आरएमसी प्रकल्प उभारण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या कामामुळे परिसरात ध्वनी आणि वायू प्रदूषण होत असून त्याचा नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे.

हेही वाचा – रेल्वे स्थानके छतांविना; ठाणे, डोंबिवली, कल्याण, अंबरनाथ, बदलापूर स्थानकांत प्रवाशांवर ऊन पावसाचा मारा

आरएमसी प्रकल्पातून सिमेंट पावडरचे धुलीकण बाहेर पडणार असून त्याचा त्रास नागरिकांना होणार आहे. लहान मुले, तरुण आणि ज्येष्ठ नागरिकांना कर्करोग, दमा, श्वासोच्छवासाच्या समस्या आणि इतर जुनाट आजार यासारख्या जीवघेण्या आजारांचा धोका निर्माण झाला आहे. हावरे सिटी गृहसंकुल परिसर हा संजय गांधी राष्ट्रीय उद्यानाजवळच आहे. यामुळे निसर्गाच्या कुशीत सदनिका घेणाऱ्या नागरिकांना आता आरएमसी प्रकल्पाच्या प्रदूषणाचा त्रास सहन करावा लागत आहे. तसेच या प्रकल्पाचा परिणाम उद्यानातील वन्यजीवांवरही होण्याची भिती व्यक्त होत आहे. यामुळे प्रकल्पाविरोधात नागरिकांनी संपात व्यक्त केला आहे.

हेही वाचा – “५० कोटी रुपये देऊन जनतेला विकत घ्याल ही अपेक्षा ठेवू नका”, आव्हाड यांची उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्यावर टीका

प्रकल्प स्थलांतरित करण्याच्या सूचना

कासारवडवली येथील हावरे सिटी आणि त्या शेजारील नागरी वस्तीजवळ ‘आरएमसी’ प्रकल्पाबाबत स्थानिक नागरिकांच्या अनेक तक्रारी आमदार प्रताप सरनाईक यांच्याकडे आल्या होत्या. या तक्रारीच्या आधारे त्यांनी त्याठिकाणी जाऊन प्रकल्पाची पाहणी करत संबंधित अधिकाऱ्यांना सांगून प्रकल्पाचे काम बंद केले. तसेच हा प्रकल्प नागरी वस्तीच्या किमान पाच किलोमीटर दूर अंतरावर तातडीने स्थलांतरित करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.