डोंबिवली येथील पश्चिमेतील कुंभारखाणपाडा भागातील स्मशानभूमीत परिसरातील नागरिकांना पार्थिव दहनासाठी खुली करावी. मागील काही वर्षापासून ही स्मशानभूमी सुसज्ज असुनही येथे पार्थिव दहनात अनेक अडथळे आणले जातात. त्यामुळे कुंभारखाणपाडा, राजूनगर भागातील नागरिकांना पार्थिव दहनासाठी पाच किलोमीटरचा वळसा घेऊन डोंबिवली पूर्वेतील शिवमंदिर किंवा पाथर्ली स्मशानभूमीत जावे लागते, अशी तक्रार या भागातील रहिवासी आणि ‘उबाठा’चे डोंबिवली उपशहर संघटक संजय पाटील यांनी पालिका प्रशासनाकडे केली आहे.
डोंबिवली पश्चिमेतील कुंभारखाणपाडा, गणेशनगर, राजूनगर, नवापाडा, गरीबाचापाडा या जुन्या वस्तीत नवीन गृहसंकुले उभी राहिली आहेत. या वस्तीत कोणाचे निधन झाल्यास यापूर्वी पार्थिव कुंभारखाणपाडा भागातील पत्रे निवारा असलेल्या स्मशानभूमीत दहन केले जात होते. जुनी स्मशानभूमीची दुरवस्था झाल्याने या जागेत पालिकेने काही वर्षापूर्वी नव्याने स्मशानभूमी उभारली आहे. या स्मशानभूमीचा वापर करताना नागरिकांना अनेक अडथळे पार करावे लागते. पालिकेची स्मशानभूमी असूुनही अनेक वेळा प्रवेशव्दाराला कुलूप असते. नवीन गृहसंकुलातील नागरिक कुंभारखाणपाडा स्मशानभूमीत पार्थिव घेऊन गेले तर तेथे लाकडाची वखार नाही. नागरिकांना लाकडे मिळविण्यासाठी धावपळ करावी लागते. स्थानिकांची स्मशानभूमी म्हणून काही वेळा नवीन गृहसंकुलातून आलेल्या नागरिकांना स्मशानभूमीत पार्थिव दहनासाठी काही मंडळींंकडून विरोध केला जातो. त्यामुळे नागरिकांना पाच ते सहा किमीचा फेरा घेऊन पूर्व भागातील शिवमंदिर किंवा पाथर्ली स्मशानभूमीत जावे लागते, असे तक्रारदार पाटील यांनी सांगितले.
नागरिकांची ही गैरसोय विचारात घेऊन पालिकेने या स्मशानभूमीत लाकडाची वखार सुरू करावी. इतर पालिका स्मशानभूमीप्रमाणे ही स्मशानभूमी २४ तास खुली असावी, असी मागणी पाटील यांनी केली आहे. कुंभारखाणपाडा स्मशानभूमीत सर्व नागरिकांना पार्थिव दहनासाठी प्रवेश आहे. बाजुच्या खंडोबा मंदिरातील नागरिक या स्मशानभूमीसाठी लाकडे पुरवितात. तेथून लाकडे घेऊन नागरिक पार्थिवाचे दहन करतात. या स्मशानभूमीत लाकडाची वखार सुरू करावी म्हणून पालिकेला पत्र दिले आहे. काही मंडळी या स्मशानभूमीतील लाकूड वखारीचे कंत्राट मिळविण्यासाठी राजकारण करून या स्मशानभूमीविषयी नाहक गैरसमज पसरवित आहेत. – विकास म्हात्रे, माजी नगरसेवक, राजूनगर.
कुंभारखाणापाडा स्मशानभूमी सुरू आहे. तेथे कोणालाही अडथळा केला जात नाही. या स्मशानभूमीच्या बाजुला गॅस शवदाहिनीचे काम सुरू आहे. ते लवकरच पूर्ण होईल. – योगेश गोटेकर, कार्यकारी अभियंता.