डोंबिवली : डोंबिवली रेल्वे स्थानकाजवळील दिवा-पनवेल, दिवा- वसई रेल्वे मार्गावरील अप्पर कोपर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर छत नसल्याने प्रवाशांना उन्हात उभे राहून शटल पकडावी लागते. पावसाळ्यात प्रवाशांची सर्वाधिक कुचंबणा झाली. आता सहा महिने उन्हात उभे राहून शटल पकडावी लागणार असल्याने प्रवाशांमध्ये अस्वस्थता होती. याविषयी प्रवाशांच्या तक्रारी वाढू लागल्यानंतर मध्य रेल्वे प्रशासनाने अप्पर कोपर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर छप्पर टाकण्याचे काम सुरू केले आहे.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

कर्जत, कसारा, बदलापूर, टिटवाळा, कल्याण, डोंबिवली, दिवा परिसरातील वसई, विरार, डहाणू भागात जाणारा नोकरदार, व्यावसायिक, मजूर अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून प्रवास करतो. हाच प्रवासी पनवेल भागात जाण्यासाठी अप्पर कोपर रेल्वे स्थानकाला प्राधान्य देतो. अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून दिवा-वसई, पनवेल-वसई शटल धावतात. या शटल सेवेमुळे प्रवाशांचा दादर येथून पश्चिम उपनगरात जाण्याचा त्रास वाचतो. बहुतांशी प्रवासी अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून प्रवास करणे पसंत करतात.

हेही वाचा…सौंदर्या ”सोनचाफ्याचा भिवंडीत यशस्वी प्रयोग ! संतोष पाटील या शेतकऱ्याची यशस्वी फुलशेती, सूर्यफुलाच्या आंतरपिकातूनही उत्पन्न

या रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवरील काही भागात छप्पर नव्हते. त्यामुळे प्रवाशांना उन्हात उभे राहून शटल पकडावी लागते. पावसाळ्यात छप्पर नसलेल्या भागात उभे राहून पावसात भिजून शटल पकडण्याचा त्रास प्रवाशांनी सहन केला. आता पुढील सहा महिने उन्हात उभे राहून शटल पकडावी लागणार असल्याने प्रवाशांमध्ये चिंतेचे वातावरण होते. अप्पर कोपर रेल्वे स्थानकातून धावणाऱ्या शटल सेवा अर्धा ते एक तासाच्या अंतराने धावतात. या शटल अनेक वेळा विलंबाने धावतात. तोपर्यंत प्रवाशांना रेल्वे स्थानकातील जिन्यांच्या पायऱ्या, स्कायवाॅक किंवा जिन्याच्या खाली बैठक मारून सावलीचा आधार घ्यावा लागत होता. अनेक प्रवासी उन्हात उभे राहून शटलची प्रतीक्षा करत असत.

प्रवाशांच्या या वाढत्या त्रासाविषयी ‘लोकसत्ता’ने काही दिवसापूर्वी अप्पर कोपर रेल्वे स्थानकात फलाटावर छत नसल्याने प्रवाशांच्या होणाऱ्या कुचंबणेचे वृत्त प्रसिध्द केले होते. या वृत्ताची गंभीर दखल रेल्वे प्रशासनाने घेतली. आता अप्पर कोपर रेल्वे स्थानकातील फलाट क्रमांक तीनवर छत बसविण्याचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे.

हेही वाचा…गुणवत्ता वाढीसह आता पटसंख्या वाढीवरही जिल्हा परिषदेचा भर, यासाठी दिशा उपक्रम ठरतोय़ लाभदायी

अप्पर कोपर रेल्वे स्थानकातील फलाटावर छत नसल्याने पावसाळा, एप्रिल, मेमधील रखरखीत उन्हात शटल पकडताना प्रवाशांना खूप त्रास होतो. शटल येईपर्यंत प्रवाशांना रेल्वे जिना किंवा स्कायवाॅकवर बसावे लागत होते. आता छताचे काम सुरू झाल्याने प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. मनोज साळुंखे प्रवासी.