ठाणे – दिवा रेल्वे स्थानकातील प्रवाशांसाठी अत्यंत महत्वाचा असलेला मुंबईच्या दिशेकडील पादचारी पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु झाले आहे. या पादचारी पुलाच्या रुंदीकरणासाठी लागणाऱ्या खांब उभारण्याचे काम मध्य रेल्वे प्रशासनाकडून सद्यस्थितीत सुरु आहे. या रुंदीकरणाच्या कामाच्या पुर्णत्वानंतर दिवा स्थानकात सकाळी आणि सायंकाळी पुलावर होणाऱ्या मोठ्या गर्दीतून प्रवाशांना दिलासा मिळणार आहे. यासाठी रेल्वे प्रवासी संघटनांकडून सातत्याने मागणी केली जात होती.
ठाणे पल्याड रेल्वे स्थानकातील सर्वात महत्वाचे आणि कायम गर्दीने गजबजलेले रेल्वे स्थानक म्हणून दिवा रेल्वे स्थानक ओळखले जाते. येथून दररोज हजारो प्रवासी उपनगरीय लोकल गाड्यांनी ठाणे, मुंबई तसेच कल्याण, डोंबिवलीच्या दिशेने आपल्या नियमित कामासाठी प्रवास करतात. दिवा रेल्वे स्थानकातून कोकणात जाणाऱ्या रेल्वे प्रवाशांची संख्या देखील लक्षणीय आहे. यामुळे दिवा स्थानक कायम गर्दीने गजबजलेले असते. मागील काही वर्षांपूर्वी दिवा रेल्वे स्थानकाचा कायापालट प्रकल्प राबविण्यात आला होता. होम प्लॅटफॉर्म उभारणे, फलाटांचे रुंदीकरण आणि लांबी वाढविणे यांसारखी कामे करण्यात आली होती. स्थानकातील रेल्वे फाटकातुन रूळ ओलांडल्याने अनेक अपघात व्हायचे. याचे प्रमाण रोखण्यासाठी स्थानकात जाण्यासाठी आणि बाहेर पाडण्यासाठी सरकते जिने बसविण्यात आले आहे. यामुळे येथील अपघात ही थांबले आहेत. मात्र रेल्वे स्थानकात मुंबईच्या दिशेने असणारा आणि शहराच्या पूर्व भागाला जोडणारा पादचारी पूल अरुंद असल्याने प्रवाशांना कायमच गर्दीचा सामना करावा लागतो. तर दिवा शहरातील बहुतांश लोकवस्ती शहराच्या पूर्व भागात आहे. तसेच मुख्य बाजारपेठही शहराच्या पूर्व भागातच आहे. यामुळे स्थानकात सकाळी आणि सायंकाळी बाजारपेठेत जाणाऱ्या नागरिकांची आणि प्रवाशांची मोठी गर्दी पाहायला मिळते.
हेही वाचा >>> ठाणे आणि भिवंडी शहरातील अंतर कमी होणार; कासारवडवली ते खारबाव खाडीपुलासह जोडरस्ता प्रकल्पाची आखणी
अनेकदा चेंगराचेंगरी सदृश्य परिस्थिती ही होते. याच पार्श्वभूमीवर येथील प्रवासी संघटनांकडून पुलाच्या रुंदीकरणाचे काम करण्याची मध्य रेल्वे प्रशासनाकडे सातत्याने मागणी करण्यात येत होती. यासाठी कल्याण लोकसभा मतदारसंघाचे खासदार डॉ.श्रीकांत शिंदे यांनी रेल्वे प्रशासनाच्या अधिकाऱ्यांसमवेत बैठक घेऊन या पुलाच्या रुंदीकरणाचे काम पूर्ण करण्यासाठी पाठपुरावा केला होता. दरम्यानचा काळात विधानसभा निवडणुका लागल्याने कामाला संथगती प्राप्त झाली होती. मात्र आता मध्य रेल्वे प्रशासनाकडून पुलाच्या रुंदीकरणाचे काम हाती घेण्यात आले आहे. सद्यस्थितीत रुंदीकरणासाठी लागणाऱ्या खांब उभारणीचे काम सुरु आहे. येत्या काही आठवड्याच्या कालावधीत हे काम पूर्ण झाल्यानंतर मेगाब्लॉक घेऊन गर्डर टाकण्याचे काम पूर्णत्वास जाईल अशी माहिती रेल्वे प्रशासनाकडून देण्यात आली आहे. यामुळे पादचारी पुलावर होणाऱ्या गर्दीमुळे त्रस्त असलेल्या प्रवाशांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे.
दिवा रेल्वे स्थानकातील पादचारी पूल अरुंद असल्याने प्रवाशांना आणि नागरिकांना नाहक त्रास सहन करावा लागत होता. यासाठी सातत्याने मध्य रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा केला होता. अखेर या पुलाच्या रुंदीकरणाचे काम सुरु झाले असून लवकरच काम पूर्ण झाल्यावर प्रवाशांना आणि नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. – आदेश भगत, अध्यक्ष, दिवा रेल्वे प्रवासी संघटना