डोंबिवली – डोंबिवली रेल्वे स्थानकातील वाढती गर्दी विचारात घेऊन मध्य रेल्वे प्रशासनाने डोंबिवली रेल्वे स्थानकात फलाट क्रमांक एक ते पाच क्रमांकांना जोडणारा एक पादचारी पूल उभारण्याचे काम सुरू केले आहे. या जिन्यामुळे दिवा बाजुच्या दिशेने डोंबिवलीतील प्रवाशांना दोन पादचारी पूल उपलब्ध होणार आहेत.
या नवीन पुलामुळे प्रवाशांना डोंबिवली रेल्वे स्थानकात चौथा पादचारी पूल उपलब्ध होणार आहे. यापूर्वी कल्याण बाजूकडील एक, दुसरा डोंबिवली पूर्वेचा लक्ष्मी रुग्णालय ते पश्चिमेतील वृंदावन हाॅटेल, तिसरा व्दारका हाॅटेल ते रामनगर रेल्वे तिकीट खिडकी अशाप्रकारचे जिने यापूर्वीपासून आहेत. आता दिवा बाजूकडील व्दारका हॉटेल ते पूर्वेतील रामनगर रेल्वे तिकीट खिडकीच्या जवळ चौथा पादचारी पूल उभारणीचे काम रेल्वे प्रशासनाने सुरू केले आहे.
हेही वाचा >>> कल्याण लोकसभा कमळ चिन्हावर लढवा; भाजपच्या पदाधिकाऱ्यांचे चंद्रशेखर बावनकुळे यांना पत्र
या नवीन पुलाला फलाट क्रमांक, एक अ, तीन, चार आणि पाचवरील जिने जोडले जाणार आहेत. डोंबिवली रेल्वे स्थानकातून दररोज सुमारे तीन लाखाहून अधिक प्रवास दररोज प्रवास करतात. शिळफाटा, पलावा या नवीन गृहप्रकल्पातील रहिवासी डोंबिवली रेल्वे स्थानकातून प्रवास करत आहेत. पूर्व-पश्चिमेत येजा करणाऱ्या प्रवाशांना या नवीन पादचारी पुलाचा उपयोग होणार आहे. येत्या सहा महिन्याच्या कालावधीत पूर्ण करण्याचे नियोजन रेल्वेने केले आहे.
प्रवाशांचे हाल
नवीन पादचारी पूल उभारणीचे काम फलाट क्रमांक एक ए वरून सुरू करण्यात आले आहे. डोंबिवली लोकल या ठिकाणच्या फलाटावर येते. त्यामुळे सकाळ, संध्याकाळ गर्दीच्या वेळेत काम सुरू असलेल्या ठिकाणाहून लोकलमधून चढताना, उतरताना प्रवाशांचे हाल होत आहेत. पावसाळ्यापूर्वी ही कामे पूर्ण करण्याची मागणी प्रवाशी करत आहेत. काम सुरू असलेल्या ठिकाणाहून एकावेळी दोन प्रवासी येजा करतात. महिला प्रवाशांना या निमुळत्या जागेतून येजा करताना सर्वाधिक त्रास होतो.