मध्य रेल्वेच्या अंबरनाथ स्थानकावर रिकाम्या ईएमयू रेकचा एक डबा रुळावरून घसरल्याने रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली आहे. सकाळी ८.२५ वाजता एक डबा घसरला. त्यामुळे अनेक लोकल आणि लांब पल्ल्याच्या गाड्या जागच्या जागी खोळंबल्या आहेत.
देखभाल दुरुस्ती आणि अभियांत्रिकी कामांसाठी रविवारी मेगा ब्लॉक घेण्यात येतो. त्यानुसार, आज (१८ जून) मध्य रेल्वेतर्फे यापूर्वीच देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी मेगाब्लॉक जाहीर करण्यात आला होता. त्यानुसार, ठाणे ते कल्याण अप आणि जलद मार्गावर मेगा ब्लॉक आज घेण्यात येत आहे. त्यामुळे या मार्गावर राहणाऱ्या प्रवाशांची गैरसोय होण्याची शक्यता आहे. त्यामुळे मेगाब्लॉकची वेळ साधून रेल्वे प्रवास करण्याकडे प्रवाशांचा कल होता. परंतु, त्याआधीच अंबरनाथ रेल्वे स्थानकात लोकलचा डबा रुळावरून घसरला. सकाळी आठ वाजून २५ मिनिटांच्या सुमारास अंबरनाथ रेल्वे स्थानकात साइडिंग मार्गिकेवरून मुख्य मार्गिकेवर रिकामी लोकल गाडी येत होती. या लोकल गाडीच्या डब्याचे एक चाक रुळावरून घसरले. त्यामुळे कल्याण ते कर्जत रेल्वे मार्गावरील वाहतूक सेवा विस्कळीत झाली असल्याची माहिती रेल्वे प्रशासनाने दिली.
हेही वाचा >> मुंबई : अंबरनाथ येथे लोकल रुळावरून घसरली, कल्याण-कर्जत दरम्यानची लोकल सेवा विस्कळीत
परिणामी कल्याण ते कर्जत दरम्यानची वाहतूक विस्कळीत झाली असून लोकमान्य टिळक – विशाखापट्टणम ही डाऊन मार्गावरची एक्स्प्रेस अंबरनाथ स्थानकावर थांबवण्यात आली. तर, डाऊन मार्गावरून धावणारी बदलापूर लोकल आणि अंबरनाथ लोकल उल्हासनगर येथे थांबवण्यात आली आहे. दरम्यान, कल्याण ते बदलापूर मार्गावरील वाहतूक पूर्णपणे थांबवण्यात आली बदलापूर ते कर्जत मार्ग कार्यरत आहे. तर, अप मार्गावरील कर्जत ते कल्याण विभागही कार्यरत असल्याची माहिती मध्य रेल्वेकडून देण्यात आली आहे.
डबा पुन्हा रुळावर आणून वाहतूक लवकरात लवकर पूर्ववत करण्याचे प्रयत्न सुरू असल्याचेही मध्य रेल्वेकडून कळवण्यात आले आहे. दरम्यान, मध्य रेल्वेचे वरिष्ठ अधिकारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
मध्य मार्गावर आज मेगाब्लॉक
ठाणे कल्याण अप आणि डाऊन जलद मार्गावर आज मेगाब्लॉक घेण्यात आला आहे. सकाळी १०.४० मिनिटांनी हा ब्लॉक सुरू झाला असून दुपारी ३.४० मिनिटांपर्यंत हा ब्लॉक असेल. या ब्लॉकमुळे सीएसएमटीपासून सकाळी ९.३० ते दुपारी २.४५ वाजेपर्यंत सुटणाऱ्या डाऊन जलद सेवा ठाणे आणि कल्याण स्थानकांदरम्यान डाऊन धिम्या मार्गावरून वळवण्यात येणार असून नियोजित थांब्यांव्यतिरिक्त कळवा, मुंब्रा आणि दिवा स्थानकांवर थांबतील. कल्याण येथून सकाळी १०.२८ ते दुपारी ३.२५ पर्यंत सुटणाऱ्या अप जलद लोकल सेवा कल्याण आणि ठाणे स्थानकांदरम्यान अप धिम्या मार्गावर वळवण्यात येणार आहेत.