कल्याण – टिटवाळा-खडवली रेल्वे स्थानकांदरम्यान सोमवारी रात्री आठ वाजता मालगाडीचे कपलिंग (सांधा जोड) तुटल्याने या रेल्व मार्गावरील रेल्वे सेवा सुमारे एक तास विस्कळीत झाली. कसारा, आसनगावकडे जाणाऱ्या लोकल, पंचवटी एक्सप्रेस गाड्या जागोजागी खोळंबून राहिल्या. कसाराकडून मुंबईत येणाऱ्या लोकल, लांब पल्ल्याच्या गाड्या खडवली, आसनगाव दरम्यान खोळंबल्या.

आर्काइव्हमधील सर्व बातम्या मोफत वाचण्यासाठी कृपया रजिस्टर करा

प्रवाशांच्या घरी जाण्याच्या वेळेत हा प्रकार घडल्याने प्रवाशांनी तीव्र नाराजी व्यक्त केली. टिटवाळा-खडवलीदरम्यान एक मालगाडी रात्री आठच्या वेळेत जात असताना अचानक या गाडीचा सांधा तुटला. तात्काळ गाडी थांबविण्यात आली. मालगाडीच्या मागे कसारा, आसनगाव लोकल, पंचवटी एक्सप्रेस होत्या. कामावरून घरी परतणारा वर्ग या लोकलमध्ये होता. सांधा जोड तुटताच तात्काळ तांत्रिक कर्मचाऱ्यांनी दुरुस्ती करून, नवीन इंजिन जोड केल्यानंतर मालगाडी मुंबईच्या दिशेने रवाना झाली.

हेही वाचा – ठाणे : निकृष्ट दर्जाचे काम करणे भोवले, आयुक्तांनी कंत्राटदाराला तीन वर्षांसाठी काळ्या यादीत टाकले

यावेळी ६.२८ ची कसारा लोकल रद्द करण्यात आली. आसनगाव, आटगाव, खर्डी दिशेने जाणाऱ्या प्रवाशांनी संताप व्यक्त केला. प्रत्येक वेळी या भागात काही दुर्घटना घडली की त्याचा फटका प्रवाशांना का, असे प्रश्न प्रवासी करत होते. गेल्या वर्षापासून खर्डी ते टिटवाळादरम्यान मालगाडी घसरणे, पेंटोग्राफ तुटणे, सांधे तुटणे असे प्रकार वारंवार घडत आहेत. रेल्वे प्रशासनाने या घटनांची दखल घ्यावी, अशी मागणी प्रवासी करत आहेत.

हेही वाचा – ठाणे : संजय राऊत यांच्याविरोधात अदखलपात्र गुन्ह्याची नोंद

मालगाडी प्रवासासाठी सुस्थितीत असल्याची खात्री झाल्यानंतर नऊ वाजता मालगाडी रवाना झाली. त्यानंतर कसारा, आसनगाव, टिटवाळा लोकल एका पाठोपाठ रवाना झाल्या. अशा काही घटना घडल्यानंतर कसारा, आसनगाव लोकलमधील प्रवाशांना पंचवटी एक्सप्रेसमधून प्रवास करण्याची मुभा देण्यात यावी. आसनगाव ते कसारादरम्यानच्या स्थानकावर एक्सप्रेसला थांबा देण्यात यावा, अशी मागणी रेल्वे प्रशासनाकडे करण्यात येणार आहे, असे कल्याण-कसारा रेल्वे प्रवासी संघटनेचे अध्यक्ष शैलेश राऊत यांनी सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Central railway disrupted due to broken coupling of goods train between titwala khadvali ssb