कळवा-ऐरोली उन्नत मार्गासाठी मध्य रेल्वेची धावपळ

एकीकडे ऐरोली आणि कळवा ही स्थानके उन्नत मार्गाने जोडून ठाणे तसेच नवी मुंबईतील प्रवाशांसाठी वाहतुकीचा आणखी एक पर्याय खुला करण्याचा प्रयत्न करणाऱ्या मध्य रेल्वेचे दिवा ते पनवेल दरम्यानच्या उपनगरीय वाहतूक प्रकल्पाकडे साफ दुर्लक्ष झाले आहे. हा मार्ग सुरू झाल्यास कल्याणपासून ठाण्यापर्यंतच्या प्रवाशांना थेट पनवेलला जाण्यासाठी नवा व सहज पर्याय उपलब्ध होणार नाहे. मात्र याबाबत मध्य रेल्वेकडून काहीही हालचाली होताना दिसत नाहीत.

दिवा ते पनवेल हा दुपदरी प्रशस्त मार्ग असून भविष्यात उपनगरीय वाहतुकीच्या दृष्टीने त्याचे चौपदरीकरण करणे शक्य आहे. सध्या या मार्गावरून पश्चिम रेल्वेहून कोकण रेल्वेकडे जाणाऱ्या मालगाडय़ा, राजधानी, जनशताब्दी आदी अतिजलद गाडय़ांची वाहतूक होत असते. दिवा ते पनवेल या मार्गाने उपनगरीय गाडय़ांची सेवा सुरू झाल्यास या भागातील दातिवली, निळजे, तळोजा, नावडे रोड, कळंबोली, पनवेल येथील रेल्वे प्रवाशांना पुढे नवी मुंबई मार्गाने थेट बेलापूर, सीबीडी आणि छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसपर्यंत जाता येईल. या मार्गावर सर्व सुविधा आणि प्रवाशांची तशी मागणी असूनही याकडे रेल्वे प्रशासनाने दुर्लक्ष केले आहे.

कल्याण ते वाशी अशी थेट उपनगरी रेल्वे सेवा सुरू करण्यासाठी कळवा येथे उन्नत स्थानक उभारले जात आहे. या प्रकल्पामुळे ठाणे स्थानकावरील प्रवाशांचा भारही कमी होणार आहे. त्यामुळे कल्याण, डोंबिवली ही शहरे थेट नवी मुंबईला जोडली जातील. रेल्वेच्या गेल्या वर्षीच्या अर्थसंकल्पात त्यासाठी निधीची व्यवस्था करण्यात आली होती. यंदाच्याही अर्थसंकल्पात या प्रकल्पासाठी अतिरिक्त निधी मंजूर करण्यात आला आहे. उन्नत मार्ग बांधण्यासाठी तयार करण्यात आलेल्या प्रकल्पात लागणाऱ्या जागेचे संपादन अद्याप रेल्वे प्रशासनाने केलेले नाही. त्यामुळे यंदाच्या अर्थसंकल्पात निधीची तरतूद होऊनही जमीन हस्तांतरणापासून इतर अनेक तांत्रिक  कामांना वेग यायला बराच काळ लागणार आहे. कळवा-ऐरोली हा उन्नत मार्ग तयार होईपर्यंत दिवा-पनवेल हा पर्यायी मार्ग सुरू केल्यास प्रवाशांचा प्रवास सुखकर होण्यास मदत होईल.उपनगरीय गाडय़ा चालवणे सोयीचे व्हावे यासाठी दोन रुळांमधील अंतर वाढविण्यात आले. या मार्गावर सर्व सुविधा पुरविण्यात आल्या आहेत. दिवा-पनवेल या मार्गावरून उपनगरीय गाडय़ा धावल्या तर या भागातील प्रवाशांना त्याचा फायदा होईल.

पर्यायी मर्गिकेची मदत

अनेकदा तांत्रिक बिघाड झाल्यास पर्यायी मार्ग उपलब्ध नसल्याने वाहतूक ठप्प होण्याचे प्रकार घडतात. अशा वेळी दिवा-पनवेल मार्गावरून कुर्ला स्थानकापर्यंत प्रवास करणे शक्य होईल. या मार्गामुळे पर्यायी मार्ग उपलब्ध होऊन रेल्वेचा प्रवास सुरळीत राहण्यास मदत होऊ शकते.

दिवा-पनवेल या मार्गिकेने निळजे, तळोजा यांसारख्या स्थानकांतील प्रवाशांना मोठय़ा प्रमाणावर फायदा होईल. गेली अनेक वर्षे असा प्रस्ताव रेल्वे प्रशासनाकडे मांडूनही कोणताही प्रतिसाद आम्हाला मिळाला नाही. संघटनेकडून येत्या बैठकीत या मार्गिकेसाठी पाठपुरावा केला जाईल.

– लता अरगडे, प्रवासी संघटना

Story img Loader