बदलापूरः कल्याणहून कर्जतकडे जाणारी मालगाडी बदलापूर रेल्वे स्थानकातून पुढे निघताना बंद पडली. साडे बाराच्या सुमारास कर्जतहून दुसरे इंजिन आणून ही मालगाडी पुढे काढण्यात आली. त्यामुळे कर्जत आणि बदलापूरहून मुंबईच्या दिशेने जाणारी रेल्वे वाहतूक विस्कळीत झाली. रेल्वे गाड्या २५ ते ३० मिनिटे उशिराने धावत होती. त्यामुळे शालेय विद्यार्थी, नोकरदारांना याचा मोठा फटका बसलाच.

सकाळी साडे दहा वाजण्याच्या सुमारास कल्याणहून कर्जतच्या दिशेने जाणारी मालगाडी फलाट क्रमांक दोन वरून जात होती. त्याचवेळी वेग मंदावलेली मालगाडी बंद पडली. ही गाडी फलाटाच्या पुढे काही तर फलाटावर निम्मी गाडी होती. त्यामुळे मुंबईहून कर्जतला जाणाऱ्या मार्गिकेचा खोळंबा झाला. त्याचप्रमाणे बदलापूर स्थानकात येणाऱ्या लोकल गाड्यांचाही खोळंबा झाला. १० वाजून ४२ मिनिटांची मुंबईला जाणाऱ्या लोकलपासून गाड्यांना याचा फटका बसला. त्यामुळे मुंबईहून येणाऱ्या आणि मुंबईकडे जाणाऱ्या लोकल गाड्यांना त्याचा फटका बसला. त्यामुळे मध्य रेल्वेचे वेळापत्रक विस्कळीत झाले. दुपारी साडे बाराच्या सुमारास कर्जतहून एक इंजिन आणून त्याद्वारे ही मालगाडी काढण्यात आली. त्यानंतर रेल्वे सेवा सुरू झाली. मात्र तोपर्यंत लोकलगाड्या आणि एक्सप्रेसगाड्यांचे वेळापत्रक बिघडले होते. मालगाडी काढल्यानंतरही मध्य रेल्वेची सेवा २५ ते ३० मिनिटे उशिराने सुरू होती.

Story img Loader