ठाणे : Central Railway Trains Running Late गेल्याकाही दिवसांपासून मध्य रेल्वे मार्गावर विविध तांत्रिक कारणांमुळे रेल्वे गाड्यांच्या वाहतुकीवर परिणाम होत असून अनेक रेल्वेगाड्यांची वाहतुक सुमारे २० ते २५ मिनीटे उशीराने धावत आहे. त्याचा प्रत्यक्ष परिणाम नोकऱ्यांवर होत असून नोकरदारांना वेळेत कामाच्या ठिकाणी पोहचता येत नाही. अनेकांना त्यांच्या दररोजच्या वेळा बदलाव्या लागत आहे. रेल्वे मार्गाची वाहतुक केव्हा वेळेत होणार असा प्रश्न प्रवाशांकडून विचारला जात आहे.
जिल्ह्यातील कसारा, टिटवाळा, आसनगाव भागातून मुंबई, ठाण्याच्या दिशेने प्रवास करणारा कामगारवर्ग मोठ्याप्रमाणात आहे. त्यामुळे या भागातून हजारो नोकरदार मुंबईच्या दिशेने ये-जा करत असतात. रस्ते मार्गे मुंबई गाठणे खर्चिक आणि वेळेचा अपव्यय करणारे असल्याने प्रवासी रेल्वे मार्गाला प्राधान्य देतात. असे असले तरी कर्जत – कसारा या दोन्ही रेल्वे मार्गांवर प्रवास करणाऱ्या प्रवाशांच्या तुलनेत रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या कमी आहेत. त्यामुळे या मार्गावरील जलद आणि धिम्या रेल्वेगाड्यांमध्ये प्रवाशांना महत्त्वाच्या रेल्वे स्थानकातून रेल्वेगाड्यांमध्ये प्रवेश करणे कठीण होत असते.
हेही वाचा >>> Illegal Chawls in Titwala : टिटवाळा उंभर्णी येथे बेकायदा चाळींची उभारणी करणाऱ्या भूमाफियावर गुन्हा दाखल
उपनगरीय रेल्वे मार्गाच्या कसारा मार्गावरून नाशिक तर कर्जत मार्गावरून पुण्याच्या दिशेने एक्स्प्रेसगाड्या आणि मालगाड्यांची वाहतुक होते. गेल्याकाही दिवसांपासून विविध तांत्रिक कारणांमुळे उपनगरीय रेल्वेगाड्यांची वाहतुक उशीराने होत आहे. यामध्ये सर्वांत महत्त्वाचे कारण लांब पल्ल्यांच्या एक्स्प्रेस रेल्वेगाड्यांना उपनगरीय रेल्वेगाड्यांच्या आधी सोडणे आहे. या प्रकारामुळे प्रवाशांना दररोज रात्री घरी परतण्यास आणि सकाळी कामाहून घरी पोहचण्यास उशीर होत आहे. नोकरदारांना अनेकदा वेळेत कामावर पोहचणे शक्य होत नाही. तर काही नोकरदारांनी आपल्या वेळांमध्ये बदल केला आहे.
रेल्वेगाड्यांच्या फेऱ्या कमी असतात. त्यात दररोज रेल्वेगाड्यांची वाहतुक उशीराने होते. त्यामुळे कामाला निघताना लवकर घरातून बाहेर पडावे लागते. कामाहून घरी निघताना कधीच वेळेत घरी पोहचता येत नाही. – समीर मेहता, टिटवाळा.
विक्रोळी येथून आसनगाव प्रवास करताना मन:स्ताप सहन करावा लागत आहे. रेल्वेगाडी कधीही वेळेत नसते. प्रशासनाकडून रेल्वे प्रवाशांना गृहीत धरले जात आहे. – मनोज जवळे, आसनगाव.