पुणे : पुण्यात सामान्य प्रसूतींपेक्षा सिझेरियन प्रसूतींचे प्रमाण वाढू लागले आहे. गेल्या तीन वर्षांत सिझेरियन प्रसूतींमध्ये सातत्याने वाढ होत आहे. गेल्या वर्षभरात हे प्रमाण ६० टक्क्यांवर पोहोचले आहे. आरोग्य व्यवस्थेतील या बदलत्या चित्राबाबत तज्ज्ञांनी चिंता व्यक्त केली आहे.महापालिकेच्या कुटुंब कल्याण विभागाच्या आकडेवारीनुसार, पुण्यात २०२१-२२ मध्ये एकूण ५९ हजार ७७४ प्रसूती झाल्या.

त्यातील ३५ हजार ९५७ सामान्य प्रसूती आणि २३ हजार ८१७ सिझेरियन प्रसूती होत्या. त्यावेळी सिझेरियनपेक्षा सामान्य प्रसूतींची संख्या जास्त होती. २०२२-२३ मध्ये एकूण ५७ हजार १०७ प्रसूती झाल्या. त्यात सामान्य प्रसूती २८ हजार ४ आणि सिझेरियन प्रसूती २९ हजार १०३ होत्या. तेव्हापासून सिझेरियनमध्ये वाढ होऊ लागली. पुण्यात २०२३-२४ मध्ये एकूण प्रसूती ६३ हजार ७७३ झाल्या. त्यात सामान्य प्रसूती २९ हजार १०१ आणि सिझेरियन ३४ हजार ६७२ होत्या. गेल्या वर्षभरात (एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५) एकूण ४८ हजार ४८९ प्रसूती झाल्या. त्यात सामान्य प्रसूती २१ हजार ६३९ आणि सिझेरियन २६ हजार ८५० होत्या. म्हणजेच एकूण प्रसूतींमध्ये सिझेरियनचे प्रमाण ६० टक्क्यांवर पोहोचल्याचे आरोग्य विभागाच्या आकडेवारीतून स्पष्ट झाले आहे.

माता मृत्यूंमध्ये घट

गेल्या तीन वर्षांत शहरात माता मृत्यूंमध्ये घट झाली आहे. शहरात २०२१-२२ मध्ये १०३ माता मृत्यू झाले होते. त्यानंतर २०२२-२३ मध्ये ९० माता मृत्यू, २०२३-२४ मध्ये ८९ माता मृत्यूंची नोंद झाली. गेल्या वर्षी (एप्रिल २०२४ ते मार्च २०२५) ७० माता मृत्यू झाले आहेत.

बालमृत्यूंमध्ये वाढ

शहरात ५ वर्षांखालील बालकांच्या मृत्यूत वाढ होत आहे. शहरात २०२१-२२ मध्ये ३७० बालमृत्यू झाले होते. त्यानंतर २०२२-२३ मध्ये १९४, २०२३-२४ मध्ये ७९२ बालमृत्यू झाले. गेल्या वर्षी (एप्रिल २०२४ ते फेब्रुवारी २०२५) ५१७ बालमृत्यू झाले आहेत.

जागतिक आरोग्य संघटनेच्या १९८५-८६ मधील अहवालानुसार एकूण प्रसूतींमध्ये सिझेरियनचे प्रमाण १५ टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असा निकष होता. नंतर संघटनेच्या एका उपसमितीने हे प्रमाण ३० टक्क्यांपेक्षा जास्त नसावे, असे मत मांडले. सध्याच्या विचार करता हे प्रमाण ५० टक्क्यांवर पोहोचले असून, ते चिंताजनक आहे. यात केवळ डॉक्टर दोषी नसून, रुग्ण आणि त्यांचे नातेवाईकही जबाबदार आहेत. दोन्ही बाजूंकडून घाई होत असल्याने सिझेरियनला प्राधान्य दिले जात आहे. डॉ. अरुण गद्रे, ज्येष्ठ स्त्रीरोगतज्ज्ञ