ठाणे जिल्ह्यातील विविध शहरांत वाढत असलेला सोनसाखळी चोरांचा उपद्रव आता लग्नसमारंभातील पाहुण्यांना होत आहे. लग्नसराईचा हंगाम असल्याने असे सोहळे असलेल्या परिसरात लक्ष ठेवून त्या ठिकाणी येणाऱ्या महिलांच्या गळय़ातील दागिने लांबवण्याचे प्रकार वाढत चालले आहेत. अलीकडेच, २७ एप्रिल रोजी बदलापुरातील वेगवेगळय़ा घटनांत लग्नसमारंभावरून परतणाऱ्या चार महिलांच्या गळय़ातील दागिने सोनसाखळी चोरांनी लुटून नेल्याने महिलांमध्ये घबराट पसरली आहे.
बदलापूर पश्चिमेला २७ एप्रिलला हेंद्रेपाडा, मांजर्ली, एरंजाड या परिसरात संध्याकाळी उशिरा महिलांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोन्याचे दागिने मोटारसायकलवरून आलेल्या चोरांनी चोरून नेले. यात मांजर्ली येथे घरगुती समारंभासाठी गेलेल्या कल्पना सांगळे (५२) यांचे गळ्यातील दागिने, तर एरंजाड येथे हळदी समारंभासाठी जाणाऱ्या मीनाक्षी नेहरे यांचे मंगळसूत्र ओढून चोरटे पसार झाले. या घटनांच्या पाश्र्वभूमीवर लग्नसमारंभासाठी दागिने घालून जाणाऱ्या महिलांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण निर्माण झाले आहे.
बदलापूर पूर्व व पश्चिम भागात जानेवारीपासून सोनसाखळी चोरीच्या तब्बल २० घटना घडल्या आहेत. बदलापूर पश्चिम पोलीस ठाण्याच्या हद्दीत यापैकी १० घटना घडल्या असून याप्रकरणी दोनजणांना अटक करण्यात आली आहे. त्यांच्यावर ३९२ कलमान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तर बदलापूर पूर्व पोलीस ठाण्याच्या हद्दीतसुद्धा अशा १० घटना घडल्या असून त्यातील चार गुन्ह्यांची उकल झाली असून चार जणांवर ३९२ कलमान्वये गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या गुन्हेगारांकडून २ लाख ५५ हजारांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.
हजारपेक्षा जास्त प्रीमियम लेखांचा आस्वाद घ्या ई-पेपर अर्काइव्हचा पूर्ण अॅक्सेस कार्यक्रमांमध्ये निवडक सदस्यांना सहभागी होण्याची संधी ई-पेपर डाउनलोड करण्याची सुविधा