शहरामध्ये दिवसाढवळ्या सोनसाखळी चोरीच्या घटना घडत असून त्यांना पकडण्यासाठी अवंलबिण्यात येणारे सारे उपाय निष्प्रभ ठरले असल्याचे दिसून येत आहे. सराईत चोरांनी अशा प्रकारच्या उद्योगांसाठी चक्क पगारावर माणसे ठेवल्याचेही उघड झाले आहे. सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी पोलीस गस्ती पथके, बंदोबस्त आणि विशेष मोहिमा राबविते. या मोहिमांमुळे सोनसाखळी चोरीचे प्रमाण कमी झाल्याचा दावा पोलीस प्रशासन करत असले तरी दरदिवशी किमान एक ते दोन घटना घडतच आहेत. त्यामुळे एकटय़ा-दुकटय़ा महिलेला रस्त्यावरून ये-जा करताना भीती वाटू लागली आहे.

कल्याण-डोंबिवली शहराची लोकसंख्या जवळपास १५ लाखाच्या घरात आहे. या दोन्ही शहरांच्या कार्यक्षेत्रात म्हणजेच कल्याण परिमंडळ ३ मध्ये सात पोलीस ठाणी आहेत. यात महात्मा फुले, बाजारपेठ, कोळसेवाडी, मानपाडा, विष्णुनगर, रामनगर व टिळकनगर यांचा प्रामुख्याने समावेश आहे. सातही पोल्ीास ठाण्यांच्या हद्दीत सुमारे ३० ते ४० ठिकाणी सकाळ-संध्याकाळ पोलिसांची नाकेबंदी सुरू असूनही घरफोडय़ा, सोनसाखळी, मंगळसूत्र चोरीच्या घटनांची वाढ झालेली दिसते. शहरात रस्त्यांची कामे सुरूअसून याचा फायदा चोरटय़ांना होत असल्याचे बोलले जाते. सोनसाखळी चोर आधी फेरफटका मारून जागेची पाहणी करून चोरीचे ठिकाण ठरवितात. त्यानंतर चालत्या मोटारसायकलवरून महिलांच्या गळ्यातील दागिने खेचतात. मंगळसूत्र चोरण्यासाठी चोरांनी आता महिलांचा पाठलाग करत त्यांचे घर गाठल्याची घटना मध्यंतरी कल्याणमध्ये घडली.

सोनसाखळी चोरीच्या गुन्ह्य़ात आता अनेक टोळ्या सक्रिय झाल्या असून एखादी टोळी पोलिसांच्या हाती लागली तरी दुसऱ्या टोळ्यांचा उपद्रव सुरूच आहे. इराणी वस्तीतून ताब्यात घेतलेल्या फिरदोस जाफरी या महिलेने जग्गू इराणी या सराईत गुन्हेगाराला चोरी करण्याच्या कामासाठी चक्क पगारावर ठेवल्याची माहिती पोलीस तपासात उघड झाली आहे.

सोनसाखळी चोरीच्या घटना आटोक्यात आणण्यासाठी शहरात विविध ठिकाणी नाकेबंदी करण्यात येते. पोलीस गस्ती पथकही या घटनांवर लक्ष ठेवून असते. आता हे प्रमाण कमी झाले असून कोळसेवाडी पोलीस ठाण्याचा आवाका जास्त असल्याने या भागात सध्या या घटना जास्त घडल्याचे दिसते. मात्र इतर ठिकाणी आम्ही या घटनांना आळा घातला आहे.

-संजय जाधव, कल्याण परिमंडळ ३ चे पोलीस उपायुक्त