आठ महिन्यांत केले २२ गुन्हे
वयोवृद्ध महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातून मंगळसूत्र व सोनसाखळी चोरणाऱ्या दुकलीला ठाणे पोलीस आयुक्तालयातील सोनसाखळी चोरी प्रतिबंधक पथकाने अटक केली आहे. रुपेश मनोहर बेलेकर (३५), पाशा खुर्शीद शेख (१९) असे अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. त्यांच्याविरोधात २२ गुन्हे उघडकीस आले आहेत.
कल्याण-डोंबिवली परिसरातील वयोवृद्ध महिलांना लक्ष करून त्यांना सोसायटीच्या जिन्यामध्ये गाठून भिंतीवर ढकलून दुखापत करायची आणि त्यानंतर त्यांच्या गळ्यातील मंगळसूत्र व सोनसाखळी चोरायची असे प्रकार गेल्या काही महिन्यांपासून वाढले होते. यामुळे महिलावर्गात भीतीचे वातावरण निर्माण झाले होते. ठाणे शहर पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांनी या सोनसाखळी चोरांना आळा घालण्यासाठी प्रत्येक परिमंडळात सोनसाखळी चोरी प्रतिबंधक पथकाची नेमणूक केली आहे.
कल्याण-डोंबिवली शहरातील वाढत्या सोनसाखळी चोरीला आळा घालण्यासाठी हे पथक गेले दोन महिने प्रयत्नशील होते. या चोरटय़ांचा तसेच चोरीला गेलेल्या एका मोटारसायकलीचा तपास करीत असताना ३० मे रोजी या पथकाला खबऱ्याकडून माहिती मिळाली. या वेळी पोलिसांनी बेलेकर व शेख या दोघांना मोटारसायकलसह पकडले. तपासात या दोघांनी वृद्ध महिलांना लक्ष्य करून त्यांच्या गळ्यातील सोनसाखळी व मंगळसूत्र चोरल्याची कबुली दिली. तसेच परिसरातील सीसीटीव्हीच्या छायाचित्रणाचीही पोलिसांना तपासात मदत झाली. या दोघांविरोधात डोंबिवली पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी त्यांच्याकडून चोरी केलेल्या गुन्ह्य़ातील एकूण आठ लाख पाच हजार नऊशे किमतीचे सोन्याचे मंगळसूत्र व सोनसाखळी जप्त केले आहेत. तसेच दोन लाखांची रोख रक्कम, एक मोटारसायकल व एक वातानुकूलित यंत्रही जप्त केले आहे. कल्याण पश्चिमेतील बारावे गाव येथे राहणारा रुपेश बेलेकर व डोंबिवलीतील आजदे गाव येथे राहणारा पाशा शेख यांची आठ महिन्यांपूर्वी ओळख झाली असून दोघांनीही झटपट पैसे कमाविण्यासाठी हा पर्याय निवडला.