सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलिसांच्याच पथकावर शनिवारी चोरटय़ांनी जीवघेणा हल्ला केला असून या हल्ल्यात पथकाचे प्रमुख असलेले साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कुंभार हे गंभीर जखमी झाले आहेत. तसेच या हल्ल्यात पथकातील इतर पाच पोलीस कर्मचारीही जखमी झाले आहेत. कल्याण जवळील मोहने येथे लपून बसलेल्या चोरटय़ांचे कोंबिंग ऑपरेशन करताना हा हल्ला चोरांनी केला आहे.
विठ्ठलवाडी, उल्हासनगर, अंबरनाथ, बदलापूर या परिसरात होणाऱ्या सोनसाखळी चोरीच्या घटनांना आळा घालण्यासाठी उल्हासनगरमधील परिमंडळ चारचे उपायुक्त वसंत जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सोनसाखळी चोरांना पकडण्यासाठी खास पथक स्थापन करण्यात आले होते. या गुन्ह्यांमध्ये हवा असलेला आशू युसुफ सय्यद हा अट्टल सोनसाखळी चोर कल्याणच्या मोहने येथील लहुजीनगर झोपडपट्टीत लपून बसला असल्याची माहिती मिळाल्यानंतर या पथकाने शनिवारी रात्री त्याला पकडण्यासाठी या ठिकाणी कोंबिंग ऑपरेशन केले होते. यात आशूसह तौफिक सय्यद, शब्बीर सय्यद, असमी दारा सय्यद आणि आपे दारा या त्याच्या साथीदारांनाही पोलिसांनी ताब्यात घेतले. मात्र आशू व्यतिरिक्त उर्वरित चोरटे पोलिसांशी झटापट करून निसटले. यानंतर त्यांचा शोध घेत असतानाच हे सर्व जण मोठय़ा जमावासह पोलिसांवर चालून आले. त्यांनी तलवारी, लोखंडी रॉड, मोठे दगड यांच्या साहाय्याने पोलीस पथकावर हल्ला करून जबर मारहाण केली. या घटनेत पथकाचे प्रमुख साहाय्यक पोलीस निरीक्षक गणेश कुंभार हे गंभीर जखमी झाले. त्यांच्या डोक्याला आणि डोळ्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांच्यावर अंबरनाथ येथील खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. इतर पोलीस कर्मचाऱ्यांनाही दुखापती झाल्या आहेत.

Story img Loader