ठाणे पोलीस आयुक्तालयाच्या हद्दीत सोनसाखळ्या चोरांनी उच्छाद मांडला असून बुधवारी दिवसभरामध्ये झालेल्या पाच घटनांमध्ये सुमारे पाच लाखांचा मुद्देमाल चोरटय़ांनी लुटला. ठाणे शहराचा मध्यवर्ती विभाग असलेल्या नौपाडय़ात त्यापैकी तीन घटना घडल्या.
   लुईसवाडी येथील मैत्री टॉवरमध्ये राहणाऱ्या अर्चना बांदल पाचपाखाडी परिसरातील गुरुकुल सोसायटी परिसरातून जात होते. त्याच वेळी मोटारसायकलवरून येणाऱ्या चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील अडीच तोळ्यांचे ५० हजार रुपये किमतीचे मंगळसूत्र खेचून पलायन केले, तर गीता राजन अय्यर चरई येथून जात असताना चोरटय़ांनी त्यांच्या गळ्यातील ८० हजार रुपये किमतीचे सोन्याचे दागिने लुटून नेले. नौपाडय़ात सुमती सकपाळ शहीद उद्यानासमोरील रोडवरून जात असताना चोरांनी त्यांच्या गळ्यातील दोन तोळ्यांचे मंगळसूत्र आणि एक तोळ्याची सोनसाखळी असा सुमारे १ लाख ६० हजार रुपये किमतीचे दागिने खेचून पळ काढला. याप्रकरणी नौपाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  अन्य एका घटनेत उन्नती गार्डनजवळील हिल व्ह्य़ू सोसायटीमध्ये राहणाऱ्या मंजुळा कोंगेरे यांच्या गळ्यातील ५० हजार रुपये किमतीचे दागिने  खेचून पळ काढला.

Story img Loader