घोडबंदर परिसरात तसेच कल्याण पूर्व भागात सोनसाखळी खेचल्याच्या घटना घडल्या असून यापैकी कल्याणमधील घटनेत महिला किरकोळ जखमी झाली.  कल्याण-डोंबिवली पाठोपाठ ठाण्यातही सोनसाखळी चोरीच्या घटना वाढू लागल्याने नागरिकांमध्ये असुरक्षिततेचे वातावरण आहे.
विक्रोळी पार्कसाइट परिसरात राहणाऱ्या कुंदा पाटील (५७) घोडबंदर परिसरातील ‘हॅपीव्हॅली’ भागातून रस्ता ओलांडत असताना मोटारसायकलवरून आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळय़ातील दागिने खेचण्याचा प्रयत्न केला. यापैकी एक मंगळसूत्र त्याच्या हातात सापडले, तर दुसरी सोनसाखळी अर्धवट तुटून त्याच्या हाती आली. याप्रकरणी कापूरबावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दरम्यान, कल्याण येथील काटेमानवली भागात पौंडर तिनम चंद्रशेखर (३६) यांच्या गळय़ातील सोनसाखळीही चोरटय़ांनी हिसकावून नेली. त्या सोमवारी पूर्व भागातील गणेश विद्यामंदिर शाळेजवळून पायी जात असताना पाठीमागून चालत आलेल्या चोरटय़ाने त्यांच्या गळय़ातील दागिने खेचण्याचा प्रयत्न केला. यावेळी पौंडर यांनी त्याला रोखण्याचा प्रयत्न केला असता झटापटीत त्यांच्या गळय़ाला दुखापत झाली. याप्रकरणी कोळशेवाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Story img Loader