शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून ओळखले जाणारे चम्पासिंग थापा यांनीही उद्धव ठाकरे यांची साथ सोडत आज (सोमवार) मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला. एकेकाळी मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ओळख असलेल्या थापा यांनी घेतलेल्या निर्णयामुळे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चा सुरु झाल्या असुन, उद्धव ठाकरेंसाठी हा एक धक्का मानला जात आहे. याचबरोबर बाळासाहेबांचे सेवेकरी असलेले मोरेश्वर राजे यांनीही यावेळी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठींबा दिला.
शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे अत्यंत विश्वासू सेवेकरी म्हणून चम्पासिंग थापा हे ओळखले जातात. बाळासाहेब हे राज्यात दौरे किंवा सभेनिमित्त जायचे. त्यावेळेस त्यांच्यासोबत थापा हे सावलीसारखे उभे असायचे. बाळासाहेबांच्या प्रकृतीची काळजी घेणे, त्यांना औषधे देणे आणि जेवण देणे अशी कामे ते करीत होते. मातोश्रीमधील एक सदस्य म्हणून ते ओळखले जायचे. बाळासाहेब यांच्या निधनानंतर थापा यांनी मातोश्रीसोबतच राहणार असल्याचे स्पष्ट केले होते. असे असतानाच, आज (सोमवार) त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची ठाण्यातील टेंभीनाका येथील देवीच्या मिरवणुकीदरम्यान भेट घेऊन त्यांना पाठींबा दिला.
उद्धव ठाकरे यांची विचारधारा पटत नाही का? –
याप्रसंगी उद्धव ठाकरे यांची विचारधारा पटत नाही का? असा प्रश्न पत्रकारांशी थापा यांना विचारला असता, “प्रत्येकाची विचारधारा वेगळी असते. माझ्या मनाला वाटले म्हणून मी मुख्यमंत्री शिंदे यांच्याकडे आलो. त्या व्यक्तिरिक्त माझ्या मनात काहीच नाही.”, अशी प्रतिक्रीया त्यांनी दिली. “उद्धव ठाकरे यांच्या भेटीगाठी देखील व्हायच्या आणि मातोश्रीवरही जात होतो.”, असेही त्यांनी स्पष्ट केले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे काय म्हणाले? –
तर, “बाळासाहेबांसोबत कोण राहतो? असे जर कुणी विचारले, तर लगेच नाव यायचे थापा. ते बाळासाहेबांसोबत सावली सारखे राहिले. आता थापा हे सुद्धा देवीच्या उत्सवात सामील झाले असून त्यांनी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि हिंदूत्वाचे विचार पुढे नेत असल्याचे सांगितले. जी चुक २०१९ ला व्हायला नको होती, ती तुम्ही दुरुस्त करत आहात. बाळासाहेबांचे विचार जो कोणी पुढे नेईल. त्याच्याबरोबर सदैव राहील, असे सांगत त्यांनी बाळासाहेबांच्या आणि हिंदूत्वाच्या विचारांच्या आपल्या शिवसेनेला पाठींबा दिला आहे.”, असे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी म्हटले.