लोकसत्ता खास प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

डोंबिवली: शिळफाटा रस्त्यावरुन डोंबिवलीत रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारावरुन प्रवेश करतानाच्या नाल्याचा संरक्षित कठडा काँक्रीट रस्ता करताना तोडण्यात आला आहे. या नाल्याच्या दोन्ही बाजुचे कठडे तोडण्यात आले असल्याने मोठा अपघात याठिकाणी होण्याची शक्यता प्रवाशांकडून वर्तवली जात आहे.

शिळफाटा रस्त्यावरील रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारासमोरील रस्त्यावरुन कल्याणकडून शिळफाटाकडे जाणारी, डोंबिवलीत प्रवेश करणारी, शिळफाटाकडून कल्याणकडे जाणारी आणि डोंबिवलीत प्रवेश करणारी वाहने येजा करतात. याशिवाय आजुबाजुच्या गृहसंकुलातील वाहनांची या रस्त्यावरुन येजा सुरू असते. या चौकाच्या एका कोपऱ्याला एमआयडीसी, गोळवली भागातील पाणी वाहून नेणारा नाला आहे. या नाल्यातून बारमाही पाणी वाहत असते. पावसाळ्यात हा नाला दुथडी वाहत असतो. यापूर्वी या नाल्याच्या दोन्ही बाजुने संरक्षित कठडे होते. हे कठडे शिळफाटा रस्ता आणि एमआयडीसीतील खासदारांचा बंगला ते आर. आर. रुग्णालयापर्यंतच्या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याच्या कामाच्यावेळी ठेकेदाराकडून तोडण्यात आले.

आणखी वाचा- ठाणे : तानसा धरण भरले, धरणातून ११०० क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरू, धरण परिसरातील गावांना सतर्कतेचा इशारा

वर्दळीच्या रस्त्यावरील नाल्यावर संरक्षित कठडे नाहीत. वाहन चालकाच्या निष्काळजीपणामुळे किंवा चालकाचा वाहनावरील ताबा सुटला तर वाहन थेट नाल्यात कोसळण्याची शक्यता आहे. या नाल्यावरुन जलवाहिन्या, रासायनिक सांडपाण्याच्या वाहिन्या, सेवा वाहिन्या नेण्यात आल्या आहेत. अपघात झाल्यास या सेवा वाहिन्यांचे नुकसान होण्याची शक्यता आहे. मुसळधार पाऊस सुरू असला की रिजन्सी अनंतम प्रवेशव्दारासमोरील शिळफाटा रस्त्यावर एक ते दोन फूट पाणी असते. रस्त्यावरील पाणी नाल्यात वाहून जाते. या जलमय रस्त्यावरुन पादचारी येजा करतात. एखादा पादचारी पाण्याचा प्रवाहात वाहून गेला तर त्याची जबाबदारी कोण घेणार, असे प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

आणखी वाचा-मुंबई- नाशिक महामार्गावर सलग दुसऱ्या दिवशी कोंडी

रात्रीच्या वेळेत रस्ता मोकळा असल्याने शिळफाटा रस्त्यावरुन भरधाव वेगाने वाहने धावत असतात. एखाद्या चालकाच्या निष्काळजीपणामुळे याठिकाणी मोठा अपघात होण्याची भीती प्रवाशांकडून व्यक्त केली जात आहे. वाहतूक पोलीसही या नाल्याला संरक्षित भिंत आवश्यक असल्याचे सांगतात. काँक्रीट रस्ते कामासाठी नाल्याचे कठडे तोडले असल्याने ते ठेकेदाराने बांधून देणे आवश्यक होते. परंतु रस्ते कामे पूर्ण झाल्यावर ठेकेदाराने या कामाकडे दुर्लक्ष केल्याचे स्थानिक रहिवासी सांगतात. एमआयडीसीचे अधिकारी दररोज या रस्त्यावरुन येजा करतात त्यांनाही नाल्याला संरक्षित कठडे नाहीत. याठिकाणी अपघात होण्याची शक्यता आहे याची जाणीव होत नसल्याने प्रवासी आश्चर्य व्यक्त करतात. एमआयडीसीतील अनेक जागरुक नागरिकांनी नाल्याला संरक्षित कठडे बांधा म्हणून एमआयडीसी, ठेकेदाराकडे मागणी केली आहे. त्याची दखल घेतली जात नाही.

अधिक माहितीसाठी एमआयडीसी डोंबिवली विभागाचे कार्यकारी अभियंता शंकर आव्हाड यांना संपर्क केला. त्यांनी आपण बैठकीत व्यस्त असल्याचे सांगितले.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chance of accident due to broken drain bank in dombivli midc mrj
Show comments