डोंबिवली पूर्व भागात रेल्वे स्थानकातून बाहेर पडल्यानंतर स्कायवाॅकवरुन प्रवासी चार पायस्थ मार्गिकेतून बाहेर पडतात. या पायस्थ मार्गिकेतील कॅनरा बँकेजवळ उतरणाऱ्या जिन्याचे कठडे गेल्या काही दिवसांपूर्वी तुटले आहेत. या भागातून येजा करताना प्रवाशांना सांभाळून येजा करावी लागते. गर्दीच्या वेळेत या जिन्यावर झुंबड उडाली तर प्रवासी जिन्यावरुन थेट रस्त्यावर पडण्याची शक्यता प्रवासी, या भागातील दुकानदारांकडून वर्तविण्यात येत आहे.डोंबिवली पूर्व हा शहरातील सर्वाधिक वर्दळीच्या भाग आहे. डोंबिवली रेल्वे स्थानकात येजा करणारा बहुतांशी प्रवासी या स्कायवाॅकवरुन प्रवास करतो. शहरासह २७ गाव, लोढा पलावा, एमआयडीसी भागातील प्रवासी या जिन्या वरुन येजा करतो. शहराच्या मुख्य प्रवेशव्दारावरील जिन्यावरील स्कायवाॅकचे कठडे तुटले असताना पालिका अधिकारी दुरुस्तीसाठी त्याकडे लक्ष देत नसल्याने प्रवासी नाराजी व्यक्त करत आहेत.
हेही वाचा >>>ठाणे शहरात आठ ठिकाणी ‘मियावाकी जंगल’; शहराला हिरवेगार करण्यासाठी महापालिकेचा उपक्रम
कल्याण, डोंबिवली शहरात आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांनी शहर स्वच्छता, शहराच्या मुख्य प्रवेशव्दारावरील रस्त्यावरील रस्ता दुभाजक, रस्ते सौंदर्यीकरणाचे उपक्रम हाती घेतले आहेत. डोंबिवली सारख्या वर्दळीच्या शहरातील दर्शनी भागातील स्कायवाॅकचे जिने तुटून त्याकडे आयुक्तांसह अधिकाऱ्यांना लक्ष देण्यास वेळ नाही का, असे प्रश्न नागरिक करत आहेत.
हेही वाचा >>>ठाणे : भिवंडीत गोळीबारात एकाचा मृत्यू; दोन संशयित ताब्यात
या स्कायवाॅकच्या खाली फेरीवाले, वडापाव विक्रेते, भिकारी, मद्यपी यांची वर्दळ असते. स्कायवाॅकच्या कठड्यावरुन उतरताना रात्रीच्या वेळेत एखादा भिकारी, मद्यपी पडला तर वाद उद्भवण्याची शक्यता आहे. घाईगडबडीत जिना चढउतर करताना प्रवाशाच्या तोल गेला तर तो थेट रस्त्यावरील एखाद्या नागरिक, विक्रेत्याच्या अंगावर पडण्याची शक्यता आहे. पालिका प्रशासनाने तातडीने या स्कायवाॅकच्या तुटलेल्या कठडयाचे काम हाती घ्यावे, अशी मागणी प्रवासांकडून केली जात आहे.
हेही वाचा >>>ठाणे : डोंबिवलीत पदपथ खचून अवजड ट्रकचे चाक गटारात रुतले
डोंबिवली पूर्व रेल्वे स्थानक परिसरातील दर्शनी भागाचे सौंदर्यीकरण केले जाणार आहे. हे काम सुरू होण्यापूर्वी कठडा दुरुस्तीचे काम हाती घेतले जाईल. या भागाची पाहणी केली आहे. सौंदर्यीकरण कामात बाधा नको म्हणून एकाचवेळी ही दोन्ही कामे केली जाणार आहेत, असे कार्यकारी अभियंता रोहिणी लोकरे यांनी सांगितले.
” स्कायवाॅकचे कठडे तुटल्याची पाहणी केली आहे. तुटलेल्या भागात संरक्षक कठडे बसविण्याचे काम लवकरच हाती घेतले जाणार आहे.”-रोहिणी लोकरे,कार्यकारी अभियंता,डोंबिवली