११५ वर्षांपासूनची नाटय़परंपरा खंडित; गाभाऱ्यातच पालखी पूजन
कल्पेश भोईर, लोकसत्ता
वसई : करोनाच्या संकटामुळे सध्या राज्यभरातील विविध ठिकाणचे यात्रौत्सव रद्द करण्याचा निर्णय संबंधित समित्यांनी घेतला आहे त्याच पार्श्वभूमीवर वसई जूचंद्र येथील सुप्रसिद्ध असलेल्या आई चंडिका मातेचा चैत्र यात्रौत्सव रद्द झाला. यामुळे नाटय़प्रयोग सादर झाला नसल्याने जूचंद्र गावाची ११५ वर्षांची नाटय़परंपराही खंडित झाली.
दरवर्षी आई चंडिका मातेच्या चैत्र यात्रौत्सव सोहळा मोठय़ा उत्साहात पार पडतो मात्र करोना विषाणूचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी सर्वत्र टाळेबंदी लागू करण्यात आली आहे. त्यामुळे यंदाच्या वर्षी ११ आणि १२ एप्रिल रोजी यात्रौत्सव हा देवीच्या गाभाऱ्यातच पालखी पूजन करून साधेपणाने साजरा करण्यात आला आहे
नायगाव पूर्वेतील जूचंद्र येथील प्रसिद्ध असलेल्या प्राचीन कालीन चंडिका देवी मंदिर आहे. लाखोंच्या संख्येने भाविकभक्त महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातून येत असतात. तसेच या मंदिराला तीर्थक्षेत्राचा दर्जा मिळाला असल्याने दरवर्षी आईच्या चैत्र यात्रौत्सवाला आणि पालखी सोहळ्याला भाविक भक्त सहभागी होतात.
मात्र यंदाच्या वर्षी करोनाचे संकट असल्याने यावर्षी भाविक भक्तांनी घराच्या घरी दीपोत्सव करून व आईची आरती करून साजरा करावा असे आवाहन चंडिका देवी न्यासातर्फे करण्यात आले होते तसेच मंदिरातही सामाजिक अंतर ठरवून पुजारी आणि मोजक्याच नागरिकांच्या उपस्थित आईचा आरती व पालखी सोहळा संपन्न झाला असल्याचे न्यासाचे अध्यक्ष हरिहर पाटील यांनी सांगितले
जूचंद्र गाव कलावंतांचे गाव म्हणून ओळखले जाते या गावात चंडिकेच्या यात्रौत्सवाच्या निमित्ताने श्री दत्त प्रासादिक नाटय़ मंडळ यांच्या वतीने ११५ वर्षांपासून विविध प्रकारचे सामाजिक विषय घेऊन समाजप्रबोधन करणारे नाटय़प्रयोग केले जातात.परंतु यावर्षी ‘करोना विषाणू’च्या संक्रमणामुळे टाळेबंदी सुरू आहे. या काळात नाटय़प्रयोग रद्द झाल्याने ही अनेक वर्षांपासून सुरू असलेली नाटय़परंपरा खंडित झाली आहे तसेच रांगोळी कलाकारांचे रांगोळी प्रदर्शन व विविध ठिकाणाहून येणाऱ्या कुस्तीगिरांसाठी आयोजित केले जाणारे कुस्त्यांचे जंगी सामन्यांच्या परंपरेतही खंड पडल्याचे आयोजकांनी सांगितले.
घरच्या घरी आनंदोत्सव
यंदाच्या वर्षी जरी आईची यात्रा होणार नसली तरी करोना सारख्या महाभयंकर विषाणूला रोखण्यासाठी घरच्या घरी दिवे लावून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. मंदिरात प्रवेश बंदी करण्यात आल्याने हा उत्सव घरीच नेहमीप्रमाणे आरती ओवाळून साजरा केला यामध्ये गावातील रस्त्यांवर रांगोळ्यांची कलाकृती, दिव्यांची आरास,फटाक्यांची आतिषबाजी , समाजमाध्यमावर आईची भक्ती गीते तसेच प्रत्येकाच्या घरोघरी यानिमित्ताने करंज्या , चकल्या, लाडू, शंकरपाळ्या अशा विविध प्रकारचे फराळाचे गोड धोड पदार्थ तयार केले.