कल्याण मधील दुर्गाडी किल्ला येथे नवरात्रोत्सवा निमित्त २६ सप्टेंबर ते ५ ऑक्टोबर नऊ दिवस भाविकांची गर्दी होणार असल्याने वाहतूक विभागाने दुर्गाडी किल्ल्या जवळील रस्त्यावर वाहतुकीत बदल केले आहेत. पर्यायी मार्गाने वाहने नेण्याच्या सूचना वाहतूक विभागाने केल्या आहेत.ठाणे वाहतूक विभागाचे उपायुक्त गणेश गावडे यांनी यासंदर्भात अधिसूचना प्रसिध्द केली आहे. शिवाजी चौक कडून लाल चौकी मार्गे भिवंडी दिशेने जाणाऱ्या वाहनांना लाल चौकी येथे अवजड वाहनांना प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने लाल चौकी येथे उजवे वळण घेऊन आधारवाडी चौक, गंधारी पूल, पडघा दिशेने इच्छित स्थळी जातील.
हेही वाचा >>> बाळासाहेबांचे विश्वासू चम्पासिंग थापा उद्धव ठाकरेंची साथ सोडून शिंदे गटात
भिवंडीकडून दुर्गाडी किल्ल्या जवळील दुर्गा माता चौक येथून शिवाजी चौक करणाऱ्या जाणाऱ्या वाहनांना दुर्गा माता चौक येथे प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने डावे वळण घेऊन आधारवाडी चौक येथून किंवा लाल चौकी येथून इच्छित स्थळी जातील. कल्याण शिळफाटा दिशेने पत्रीपूल कडून गोविंदवाडी बाह्यवळण रस्त्याने दुर्गाडी किल्ल्याकडे येणाऱ्या लहान वाहनांना संध्याकाळी सहा ते रात्री १२ वाजेपर्यंत प्रवेश बंद करण्यात आला आहे. ही वाहने जुना आग्रा रस्ता, वलीपीर रस्ता, गुरुदेव हाॅटेल, शिवाजी चौक, सहजानंद चौक, लाल चौकी मार्गे इच्छित स्थळी जातील. भिवंडीकडून येणारी लहान वाहने दुर्गाडी चौक, लाल चौकी, सहजानंद चौक, शिवाजी चौक, गुरुदेव हाॅटेल, वलीपीर रस्त्याने पत्रीपूल मार्गे इच्छित स्थळी जातील.
रुग्णवाहिका, अग्निशमन, पोलीस इतर अत्यावश्यक सेवेच्या वाहनांना हा नियम लागू नाही, असे उपायुक्त गावडे यांनी स्पष्ट केले आहे.