ठाणे : ठाणे महापालिकेच्या कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाल्यानंतर मंगळवारी ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी अधिकाऱ्यांची बैठक घेऊन रुग्णालयाच्या प्रशासकीय कामकाजासाठी नवीन कार्यालयीन अधीक्षक आणि लिपीकांची नेमणूक केली. त्यामुळे रुग्णालयाचे अधिष्ठाता, वैद्यकीय अधीक्षक यांचा प्रशासकीय कामाचा भार हलका होणार असून त्यांना केवळ रुग्णसेवशी कामकाजावर लक्ष ठेवता येणार आहे. तसेच रुग्णालयात आलेल्या सर्व रुग्णांना दाखल करुन घेण्याबरोबर त्यांना उच्च आरोग्य सेवा देण्याच्या सक्त सुचना बांगर यांनी दिल्या.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १८ रुग्णांचा मृत्यू झाला. या घटनेनंतर रुग्णालयातील आरोग्य सेवेविषयी टिका होऊ लागली. मंगळवारी रुग्णालयात आयुक्त अभिजीत बांगर यांनी रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांची बैठक घेतली. सोमवारी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रुग्णालयास भेट दिली होती, यावेळी त्यांनी दिलेल्या सूचनांच्या पार्श्वभूमीवर ही बैठक घेण्यात आली. रुग्णाला वेळेवर उपचार मिळावेत यासाठी रुग्णालयातील डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहण्याच्या सूचना बांगर यांनी बैठकीत केल्या. तसेच रुग्णालयामध्ये रिक्त पदांचा आढावा घेवून भरती प्रक्रिया सुरुच ठेवावी. काही संवर्गातील विशेष तज्ज्ञ उपलब्ध होण्यास अडचणी येत असतील तर अतिरिक्त वेतन देवून विशेष तज्ज्ञ उपलब्ध करुन घ्यावेत असेही बांगर म्हणाले.
हेही वाचा >>>डोंबिवलीत बेकायदा बांधकामे उभारणाऱ्या चार जणांवर ‘एमआरटीपी’चे गुन्हे
रुग्णालयाच्या प्रशासकीय कामकाजात बदल करण्यात आले. त्यानुसार नवीन कार्यालयीन अधीक्षक व लिपिकांची नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे यापुढे मुख्यालयाला सादर करण्यात येणारे प्रस्ताव व इतर सर्व प्रशासकीय कामे ही कार्यालयीन अधीक्षक करणार असून वैद्यकीय अधिष्ठाता आणि डाॅक्टरांवरील भार यामुळे हलका होणार आहे.
रुग्णकक्षातील रुग्णांचे व्यवस्थापन तसेच उपचार पध्दतीबाबत विभागप्रमुख जबाबदार राहतील. त्याचप्रमाणे दिवसातून दोन पेक्षा जास्त वेळा विभागप्रमुख प्रत्येक रुग्णकक्षेत पाहाणी करतील. तसेच अधिष्ठाता देखील त्यांच्या स्वत:च्या विभागाव्यतिरिक्त दररोज किमान दोन विभागांच्या रुग्णकक्षेमध्ये पाहाणी करतील. रुग्णांसाठी खाटा उपलब्ध नसतील तर त्या रुग्णांना जिल्हा शासकीय रुग्णालय किंवा मुंबईत न्यावे लागल्यास रुग्णालय प्रशासनाने रुग्णवाहिका उपलब्ध करुन देण्याच्या सूचना बांगर यांनी दिल्या. तसेच रुग्णांना लागणारी औषधे ही रुग्णालयातच उपलब्ध करावी, औषध भांडार विभागात औषधांचा साठा नियमित उपलब्ध असेल या दृष्टीने कार्यवाही करण्यात यावी. रुग्णालयात येणारा रुग्ण हा आजारांनी हतबल झालेला असतो, अशावेळी रुग्णांशी व त्यांच्या नातेवाईकांसोबत डाॅक्टर आणि कर्मचाऱ्यांनी सौजन्याने वागावे असा सल्लाही बांगर यांनी दिला.
हेही वाचा >>>ठाणे जिल्ह्याच्या विकासात अनेक आव्हाने; सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांचे प्रतिपादन
छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाच्या इमारतीच्या दुरूस्तीसाठी शासनाकडून निधी प्राप्त झाला असून लवकरच रुग्णालयाच्या बांधकामाची निविदा प्रक्रिया सुरू आहे. रुग्णालयाच्या इमारतीची दुरुस्ती करताना कोणत्याही प्रकारे रुग्णांना अडचण निर्माण होणार नाही, या दृष्टीने एक-एक मजल्याचे काम हाती घेवून ते पूर्ण केले जाणार आहे. यामुळे दुसऱ्या मजल्यावर अतिरिक्त्त खाटांची सोय केली जाणार असल्याचे आयुक्तांनी नमूद केले.