सामान्य रसिकांच्या स्वेच्छा निधीतील व्याजातून देण्यात येणारा यंदाचा चतुरंगचा जीवनगौरव पुरस्कार दुर्ग संशोधक, इतिहास अभ्यासक बाळकृष्ण तथा आप्पा परब (८३) यांना जाहीर झाला आहे. १८ डिसेंबर रोजी डोंबिवलीतील सावित्रीबाई फुले रंगमंदिरात होणाऱ्या चतुरंगच्या ३२ व्या रंगसंमेलनात हा पुरस्कार देण्यात येणार आहे.
हेही वाचा- केंद्राकडून मदत मिळूनही करोना काळात राज्यातील काही भागात अनियमितता
दुपारी चार ते रात्री १० वाजेपर्यंत रंगसंमेलनाचा कार्यक्रम होणार आहे. या रंगसंमेलनाचे स्वागताध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार डाॅ. उदय निरगुडकर आहेत. ज्येष्ठ सनदी पोलीस अधिकारी सदानंद दाते यावेळी उपस्थित राहणार आहेत. मंदिराचे विश्वस्त प्रवीण दुधे यांच्या हस्ते उदघाटन होईल. यावेळी निवड समिती पदाधिकारी डाॅ. विनय सहस्त्रबुध्दे, ज्येष्ठ पत्रकार सुधीर जोगळेकर, कंपनी सल्लागार माधव जोशी, ज्येष्ठ पत्रकार विनायक परब, प्रा. प्रसाद भिडे उपस्थित राहणार आहेत. सन्मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि तीन लाखाची पुंजी असे पुरस्काराचे स्वरुप आहे.
या रंगसंमेलनाच्या निमित्ताने लोकवाद्यांचा नादघोष करणारा ‘लोकनाद’ हा वाद्यमेळ कार्यक्रम होणार आहे. ,सत्यजीत तळवलकर, श्रीधर पार्थसारथी, कृष्णा साळुंके, नवीन शर्मा, तन्मय देवचक्के हे आघाडीचे वाद्य कलावंत तबला, मृदुंग, पखवाज, ढोलक, पेटी ही घेऊन लोकनाद कार्यक्रमात सहभागी होणार आहेत. गायिका मंजुषा कुलकर्णी-पाटील, बासरी वादक अमर ओक ‘स्वर टीपेचा-चांदण्यांचा’ या कार्यक्रमात अनोखी जुगलबंदी सादर करणार आहेत. सूत्रसंचालन समीरा गुजर करणार आहेत.
तिकीट, बसची व्यवस्था
सावित्रीबाई फुले रंगमंदिर येथे रात्री १० वाजता कार्यक्रम संपल्यावर केडीएमटीच्या बस सेवेची व्यवस्था करण्यात आली आहे. कल्याण, डोंबिवलीसाठी या बस उपलब्ध असतील. या सोहळ्याच्या प्रवेशिका १० डिसेंबरपासून दुपारी चार ते आठ वेळेत चतुरंग कार्यालय, श्रीकृष्ण निवास, टिळकनगर शाळेसमोर, टिळकनगर, डोंबिवली पूर्व येथे शैलाताई- ९८१९०२९५६२, पै फ्रेडन्स लायब्ररी, सर्वेश सभागृहाच्या मागे, भगतसिंग रोड, डोंबिवली पूर्व, तसेच चतुरंग कार्यकर्ती निलीमा भागवत-९८१९०५३५०९, सचिन आठवले- ९९२०९९२१०९ यांच्याशी संपर्क साधावा.
हेही वाचा- खड्डेमुक्त ठाण्याचा संकल्प; ‘मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे’ अभियानाचा शिंदे यांच्या उपस्थितीत शुभारंभ
आप्पा परब
वयाच्या १० वर्षापासून आप्पा परब यांना गड-किल्ल्यांची आवड निर्माण झाली. तेव्हापासून ते गड-किल्ल्यांची भ्रमंती करतात. दुर्ग संशोधक गो. नि. दांडेकर, शिवशाहीर बाबासाहेब पुरंदरे यांचा वसा ते पुढे चालवित आहेत. काही काळ नोकरी केल्यानंतर त्यांनी पूर्णवेळ दुर्ग भ्रमंती सुरू केली. एकेका किल्ल्याला त्यांनी १५ हून अधिक वेळा भेट दिली आहे. या सततच्या किल्ले भ्रमंतीमधून त्यांनी शिवकालीन अभ्यास, नाणेशास्त्र, युध्दशास्त्र यांचा अभ्यास झाला. त्यांनी ३२ पुस्तके लिहिली आहेत. प्रसिध्दीपासून दूर राहून सामाजिक, ऐतिहासिक ठेवा जतानाचे मोठे काम आप्पा परब यांनी केले आहे. शिवाजी पार्कच्या कट्ट्यावर मागील ३८ वर्ष ते पुस्तकांची विक्री करतात. या विक्रीतून मिळणारी रक्कम ती गरजू मुले, दुर्ग संवर्धन कामांसाठी वापरतात.
‘पाच हजार ८०० सामान्य लोकांच्या एक हजार रुपये देणगीच्या व्याजातून हा पुरस्कार देण्यात येतो,’ असे चतुरंग प्रतिष्ठानचे विद्याधर निमकर यांनी सांगितले.