कल्याण– कल्याण पूर्वेतील मलंग गड रस्त्यावरील भाल गाव हद्दीत सरकारी जमिनींवर काही भूमाफियांनी बेकायदा चाळी उभारण्याचे काम सुरू केले होते. या चाळींच्या बांधकामांसाठी माफियांनी या भागातील जुनाट झाडे तोडली होती. या बांधकामांची माहिती मिळताच आय प्रभागाच्या तोडकाम पथकाने या सर्व बेकायदा चाळी जमीनदोस्त केल्या.
हेही वाचा >>> टिटवाळ्यात तीन अल्पवयीन मुलांचे अपहरण
कारवाई होण्यापूर्वीच भूमाफिया, कारगिर घटनास्थळावरुन पळून गेले होते. भाल गाव हद्दीत सरकारी जमिनींवर, गावठाण हद्दीत १० हून बेकायदा चाळी उभारण्याचे काम जोरात सुरू आहे. काही चाळींची बांधकामे पूर्ण करुन त्यामधील खोल्या विकण्याच्या तयारीत माफिया आहेत, अशी माहिती आय प्रभागाच्या साहाय्यक आयुक्त हेमा मुंबरकर यांना मिळाली.
हेही वाचा >>> डोंबिवलीत वृध्द महिलेला जखमी करुन सोन्याचा ऐवज लांबविला
त्यांनी प्रत्यक्ष घटनास्थळा जाऊन बेकायदा बांधणाऱ्या माफियांची माहिती घेऊन त्यांच्यावर फौजदारी कारवाईची तयारी सुरू केली. परंतु, बांधकामाच्या ठिकाणी एकही भूमाफिया फिरकला नाही. सर्व चाळी सरकारी, गावठाण जमिनीवर बांधल्या आहेत. याची खात्री पटल्यावर साहाय्यक आयुक्त मुंबरकर यांनी आयुक्त डाॅ. भाऊसाहेब दांगडे यांच्या आदेशावरुन भाल गावातील सर्व बेकायदा चाळी जेसीबीच्या साहाय्याने भुईसपाट केल्या. ग्रामस्थांनी या कारवाईबद्दल समाधान व्यक्त केले. एक विटेचा थर देऊन निकृष्ट पध्दतीने या चाळींची बांधकामे करण्यात आली होती. या चाळींमधील खोली भूमाफिया तीन ते चार लाख रुपयांना गरजुंना विकतात, असे स्थानिकांनी सांगितले.