बदलापूर, वांगणी आणि कुडसावरे भागांत वनखात्याच्या जमिनीवरील अतिक्रमणे वन विभागाने हटवली. आठवडाभर सुरू असलेल्या या कारवाईत २२ बांधकामे जमीनदोस्त करण्यात आली.
बदलापूर पूर्व औद्योगिक क्षेत्रापासून काही अंतरावर बेकायदा बांधकामे उभारण्यात आली होती. वांगणी परिसरात वनखात्याची जमीन मोठय़ा प्रमाणावर आहे. या जमिनीवर चाळी बांधण्यात आलेल्या होत्या. ती हटवण्यासाठी बदलापूरचे वन क्षेत्रपाल तुळशीराम हिरवे यांनी तातडीने कारवाई होती घेतली.
कुडसावरे येथील बांधकामे जेसीबीच्या साहाय्याने हटवण्यात आली. या कारवाईने वांगणीत बेकायदा घरे आणि चाळी बांधणाऱ्यांना या भागांत भविष्यात थारा दिला जाणार नाही. यापुढेही वनविभागाच्या वतीने अशाच प्रकारची कारवाई हाती घेण्यात येईल, असे हिरवे यांनी सांगितले. कारवाईदरम्यान राज्य राखीव पोलीस दल आणि वनविभागाची एक तुकडी या भागात तैनात करण्यात आली होती.
अंबरनाथ, बदलापूर, वांगणी आणि कुडसावरे परिसरातील वनखात्याच्या जमिनीवर सुमारे १२०० नवी आणि जुनी बेकायदा बांधकामे करण्यात आली आहेत. येत्या काळात ती हटवण्याची मोहीम हाती घेण्यात येईल, असे सूत्रांनी सांगितले.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा