सोसायटीच्या आवारात केंद्र उभारल्यास घाऊक दरात पुरवठा करण्याचा एपीएमसीचा प्रस्ताव
किरकोळ बाजारात अवतरलेल्या महागाईमुळे खडबडून जागे झालेल्या राज्य सरकारने घाऊक बाजारात तुलनेने स्वस्त दरात विकली जाणारी भाजी घराघरांपर्यंत पोहचवता यावी, यासाठी थेट गृहनिर्माण सोसायटय़ांना भाजी विक्री केंद्र सुरू करण्यासाठी उत्तेजन देण्याचा निर्णय घेतला आहे. दुष्काळाच्या झळांवर सध्या महागडी भाजी विक्री सुरू झाली असून यामुळे सर्वसामान्यांचे जमाखर्चाचे गणित बिघडू लागले आहे. हे लक्षात घेऊन १५० पेक्षा अधिक घरे असलेल्या वसाहतीमधील एखाद्या नोंदणीकृत गृहनिर्माण संस्थेने स्वस्त भाजी विक्री केंद्र सुरू करण्याची तयारी दाखविल्यास त्यास घाऊक बाजारांमधून भाजीपुरवठा करता येईल का यासंबंधीचा प्रस्ताव बाजार समितीमार्फत तयार केला जात आहे.
यंदा पावसाने ओढ घेतल्याने राज्यातील पुणे तसेच नाशिक जिल्ह्य़ांतील भाजीपाल्याच्या उत्पादनावरही काही प्रमाणात प्रतिकूल परिणाम दिसू लागला आहे. मुंबई, ठाणे, नवी मुंबई यांसारख्या शहरांना या दोन जिल्ह्य़ांमधून प्रामुख्याने भाजीपाल्याचा पुरवठा होत असतो. त्यामुळे मुंबई कृषी उत्पन्न बाजार समिती अंतर्गत येणाऱ्या भाजीपाल्याच्या घाऊक बाजारपेठेत यंदा महाराष्ट्राच्या बरोबरीने गुजरात, आंध्र प्रदेश, राज्यस्थान या राज्यांतून भाज्यांची आवक होऊ लागली आहे. असे असले तरी घाऊक बाजारातील टंचाईचा फायदा उचलत किरकोळ विक्रेत्यांकडून दुप्पट दराने भाज्यांची विक्री केली जात आहे. या पाश्र्वभूमीवर पाऊस सुरू होऊन भाज्यांची आवक वाढेपर्यंत शहरातील वसाहतींमध्ये स्वस्त भाजी केंद्रे सुरू करण्याची चाचपणी राज्य सरकारने सुरू केली आहे. मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीने यासंबंधीचा आढावा घेण्यास सुरुवात केली असून या स्वस्त भाजी विक्री केंद्रात बाजार समिती ठरवील त्याप्रमाणे भाज्यांचे दरपत्रक ठेवण्याची सक्ती करण्याचा विचार केला जात आहे, अशी माहिती पणन विभागातील वरिष्ठ सूत्रांनी ठाणे ‘लोकसत्ता’ला दिली.
वसाहतींमधील स्वस्त भाजी केंद्रांमुळे हे दर आटोक्यात राहू शकतील, असा दावाही सूत्रांनी केला. घाऊक बाजारातील भाज्यांच्या दरांपेक्षा १० ते १५ टक्के एवढय़ा जादा दराने या केंद्रांमध्ये भाजी उपलब्ध करता येईल का याची चाचपणी केली जात आहे. या केंद्रांमध्ये घाऊक दरांपेक्षा चार ते पाच रुपयांपेक्षा वाढीव दर असणार नाहीत, असेही सूत्रांनी स्पष्ट केले. सहकारी संस्था, अपना बाझार, दूध विक्री केंद्रांवर अशी केंद्रं सुरू करता येतील का, याची चाचपणी सुरू करण्यात आली आहे. स्वस्त भाजी विक्री केंद्रांसाठी पुढील आठवडय़ात हेल्पलाइन क्रमांक जाहीर केला जाणार आहे. मोठय़ा गृहनिर्माण संस्थांच्या पदाधिकाऱ्यांना या क्रमांकावर संपर्क साधून अशी केंद्रं सुरूकरता येऊ शकतील. त्यासाठी एपीएमसीमार्फत पूर्ण सहकार्य केले जाईल, अशी माहिती सूत्रांनी दिली.
स्वस्त भाजीचा पर्याय गृहसंकुलांना खुला!
गृहनिर्माण सोसायटय़ांना भाजी विक्री केंद्र सुरू करण्यासाठी उत्तेजन देण्याचा निर्णय घेतला आहे.
Written by जयेश सामंत
आणखी वाचा
First published on: 21-04-2016 at 06:18 IST
Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheap vegetable possible in housing society