डोंबिवली : डोंबिवली येथील पूर्व रेल्वे स्थानक भागात एका पादचाऱ्याची बुवाबाजीच्या नावाखाली दोन भामट्यांनी ९० हजार रुपयांची फसवणूक केली. वर्दळीच्या फडके रस्त्यावर हा प्रकार शनिवारी घडला. रामनगर पोलीस ठाण्यात याप्रकरणी रहिवाशाने तक्रार दाखल केली आहे. पोलिसांनी सांगितले, डोंबिवली पूर्वतील गडकरी पथावरील लक्ष्मी निवासमध्ये राहणारे शंतून मित्रा (३९) शनिवारी सकाळी फडके रस्त्यावरील शामराव विठ्ठल बँकेच्या एटीएममधून पैसे काढण्यासाठी गेले होते. पाच हजार रुपयांची रक्कम आणि जवळील सोन्याची अंगठी, मोबाईल, सोनसाखळी असा एकूण ९० हजाराचा ऐवज त्यांच्या जवळ होता.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

काही कामानिमित्त शंतून डोंबिवली रेल्वे स्थानका जवळील चिमणी गल्लीत गेल्यानंतर तेथे त्यांना दोन इसम भेटले. त्यांनी शंतून यांना थांबवून त्यांना बुवाबाजीने संमोहित करुन त्यांना श्री गणेशाचे जप करण्यास सांगितले. जप करताना १०१ पावले चालण्यास सांगितले. चालताना हातात काही घ्यायचे नाही, असा दंडक भामट्यांनी घातला. जप करत चालताना हातात वस्तू नको म्हणून शंतून यांच्याकडील रोख रक्कम आणि इतर ऐवज भामट्यांनी पिशवीत काढून घेतला. शंतनू यांची पिशवी भामट्यांनी स्वताजवळ घेतली.

हेही वाचा >>> डोंबिवली: ‘टीआरपी’ वाढविण्यासाठी उलटसुलट वक्तव्य, सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांची माहिती

देव कार्य करण्यास सांगणारे भामटे आपली फसवणूक करतील असे तक्रारदाराला वाटले नाही. जप करत शंतून काही पावले पुढे गेल्यानंतर घटनास्थळावरील दोन्ही भामटे शंतनू यांची ९० हजाराचा ऐवज असलेली पिशवी घेऊन पळून गेले. शंतून यांनी पाठीमागे वळून पाहिले तर दोन्ही भामटे जागेवर नव्हते. त्यांनी आजुबाजुला चौकशी केली ते परिसरात आढळले नाहीत. दोन्ही भामट्यांनी आपली फसवणूक करुन ऐवज लांबविल्याने शंतनू यांनी रामनगर पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे. पूर्वी असे फसवणुकीचे प्रकार नेहरु रस्ता, फडके रस्ता भागात घडले आहेत.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Cheated of 90000 in dombivli in ramnagar police station complaint filed ysh
Show comments