पत्नी गंभीर आजारी आहे. तिच्या आजारासाठी पैसे पाहिजेत. माझ्या जवळ शेतात सापडलेली सोन्याची जुनी नाणी आहेत. ती विकत घ्या आणि पैसे द्या. असे सांगून तीन महिन्यांपासून डोंबिवलीतील विविध लोकांना फसविणाऱ्या एका भामट्याला पोलिसांनी शुक्रवारी अटक केली. त्याचा साथादीर फरार असून त्याचा शोध पोलीस घेत आहेत.

या भामट्याला पोलीस आपला शोध घेत आहेत अशी कुणकुण लागताच त्याने पोलिसांकडून मोबाईलच्या माध्यमातून होणारा माग चुकविण्यासाठी स्वताच्या मोबाईल मधील २५ सीमकार्ड गेल्या काही महिन्यात बदलली आहेत.भीमा सोळंकी असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. भीमाला अटक होताच त्याचा साथादार राजू उर्फ कालीया सोळंकी फरार झाला आहे.

हेही वाचा- कल्याणमध्ये पोलिसांचा खबरी म्हणून तरुणाला बेदम मारहाण

पोलिसांनी सांगितले, भीमा, कालिया हे दोघे जवळ सोन्याची बनावट नाणी घेऊन रस्त्यावर फिरायचे. फिरत असताना एखाद्या रस्त्यावर एका चांगल्या स्थितीमधील पादचाऱ्याला अडवून त्याला आपली पत्नी खूप आजारी आहे. तिच्यावर शस्त्रक्रिया होणार आहे. पण त्यासाठी पैशाची गरज आहे. ते आपणाकडे नाहीत. आमच्या जवळ सोन्याची नाणी आहेत. ही नाणी आमच्या गावाकडील शेतात सापडली आहेत. ती खूप जुनी आहेत. ती विकून पत्नीच्या आजारासाठी आम्ही पैसे जमविण्यासाठी प्रयत्न करत आहोत. आपण नाणी खरेदी केली तर ते पैसे आम्हाला पत्नीच्या आजारासाठी वापरता येईल असे समोरील पादचाऱ्याला पटवून भीमा आणि कालिया त्या पादचाऱ्याला ती नाणी खरेदी करण्यासाठी भाग पाडत होते.

५० हजार रुपयांपासून ते दीड लाख रुपयांपर्यंतची रक्कम ते पादचाऱ्याकडून उकळत होते. सोन्याचा बाजारभाव गगनाला भिडला आहे. कमी किमतीत सोन्याची नाणी मिळत असल्याने पादचारी त्याला भुलून ती नाणी खरेदी करत होता. ती नाणी नंतर जवाहिऱ्याला खरेदीदारांनी दाखविली की ती बनावट असल्याचे उघड होत होते. अशाच प्रकार आजदे गावातील एका रहिवाशाची गेल्या महिन्यात भीमा, कालियाने फसवणूक केली होती. पोलीस दाखल तक्रारीच्या अनुषंगाने तपास करत होते. अशाच प्रकारे तीन महिन्यापूर्वी डोंबिवली पूर्वेतील नेहरु रस्त्यावर कामगार नाक्यावर एका मजूर कामगार नेत्याला दोन भामट्यांनी ७५ हजार रुपयांची सोन्याची विकून फसविले होते.

हेही वाचा – पुणे : फिल्म इन्स्टिट्यूटच्या आवारात चंदन चोरी ; चंदनाची झाडे कापून चोरटे पसार

आजदे गावातील फसवणूक प्रकरणात अटक करण्यासाठी पोलीस आपला शोध घेत आहेत याची माहिती मिळताच भीमा, कालिया आपल्या मोबाईल मधील सीम कार्ड चार ते पाच दिवसाच्या अंतराने बदलत होते. जेणेकरुन पोलीस तांत्रिक माहितीच्या आधारे आपणापर्यंत पोहचू नयेत. अशाप्रकारे दोघांनी २५ सीम कार्ड काही महिन्यात बदलली. भामटे सतत सीम कार्ड बदलत असल्याने पोलिसांना त्यांचा शोध घेणे अवघड झाले होते. तांत्रिक माहितीची खातरजमा करत पोलिसांना दोन्ही भामटे विठ्ठलवाडी भागात राहत असल्याचे आढळले. सापळा लावून पोलिसांनी शुक्रवारी भीमा सोळंकी याला अटक केली. अटकेची माहिती मिळताच कालिया फरार झाला.

या दोन भामट्यांनी आतापर्यंत किती जणांना फसविले आहे. त्यांनी बनावट नाणी कुठून मिळविली. जमा केलेले पैसे कोठे खर्च केलेत याची माहिती पोलीस घेत आहेत. डोंबिवली परिसरातील भुरट्या चोऱ्या भीमाच्या अटकेने उघड होतील असा विश्वास पोलिस अधिकाऱ्यांनी व्यक्त केला.