कल्याण मध्ये एका सोनाराकडे कारागिर म्हणून काम करणाऱ्या एका कामगारानेच सोनाराची दीड लाख रुपयांची सोमवारी फसवणूक केली आहे. महात्मा फुले पोलीस ठाण्यात याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.नवाब ऐनल खान (४८) असे फसवणूक झालेल्या सोनाराचे नाव आहे. नवाब हे आपल्या नीलकमल गोल्ड, न्यू आरती सोसायटी, जरी मरी मंदिर, कल्याण येथे सोन्याचे दागिने घडविण्याचे काम करतात. त्यांच्या दुकानात हासीवुल रहिम शेख (२८, रा. तलतला, बागबरी, हुगळी, पश्चिम बंगाल) हा अनेक वर्ष प्रामाणिकपणे दागिने घडविण्याचे काम करण्यासाठी मालक नवाब यांना मदत करायचा. तसेच दुकानातील घडविलेले दागिने चिखलेबाग येथील कारखान्यात पोहचविण्याचे काम करायचा.
हेही वाचा >>>पुन्हा पाऊस जोमात; मुंबई-ठाण्याला झोडपले ; डोंबिवलीत- दिव्यात सर्वाधिक नोंद
सोमवारी संध्याकाळी मालक नवाब यांनी दुकानात घडविलेले सोन्याचे दागिने, सोन्याची लगड असा ऐवज कामगार हासीवुल शेख याच्या ताब्यात दिला. त्याला तो चिखलेबाग येथील कारखान्यात देण्यास सांगितले. नेहमीच्या विश्वासाने हासीवुल दागिने घेऊन जाईल असे नवाब यांना वाटले. दीड लाख रुपये किमतीचा हा ऐवज आहे.हासीवुल याने कारखान्यात न जाता तो सोन्याचा ऐवज घेऊन फरार झाला. बराच उशीर झाला तरी हासीवुल दुकानात परत येत नाही. नवाब यांनी कारखान्यात संपर्क केला. तेथेही हासीवुल पोहचला नसल्याचे समजले. नवाब यांनी परिसरात शोध घेतला. त्याला संपर्क केला. त्याचा मोबाईल बंद येत होता. शोधाशोध करुनही त्याचा तपास न लागल्याने हासीवुल आपले दागिने घेऊन पळून गेला, याची खात्री पटल्याने नवाब यांनी हासीवुल विरुध्द महात्मा फुले पोलीस ठाण्यात तक्रार केली. पोलिसांनी गुन्हा दाखल करुन हासीवुलचा शोध सुरू केला आहे. तो पश्चिम बंगालला पळून जाण्याची शक्यता असल्याने पोलिसांनी कल्याण रेल्वे स्थानकात पाळत ठेवली आहे.