डोंबिवली – ऑनलाइन खेळांच्या माध्यमातून भामट्यांनी डोंबिवलीतील गोळवली गावातील एक नोकरदार आणि इतरांच्या बँक खात्यांचा वापर करून दोनजणांनी लाखो रुपयांची फसवणूक केली. ऑनलाइन खेळाच्या माध्यमातून डोंबिवली, कल्याण शहर परिसरातील अनेकांची फसवणूक होण्याचे प्रमाण वाढल्याने पोलीस चक्रावून गेले आहेत.
धीरेश रघुनाथ पाटील (४०, रा. गोळवली) असे तक्रारदाराचे नाव आहे. चांदणी सिंह, मोहीत लालवाणी (रा. रोहानी सत्संग, खेमाणी रोड, उल्हासनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्या आरोपींची नावे आहेत.
हेही वाचा – ठाणे: इमारतीच्या प्लास्टरचा भाग कोसळून आठ वर्षीय मुलगा जखमी
पोलिसांनी सांगितले, आरोपी चांदणी आणि लालवाणी यांनी तक्रारदार धीरेश आणि इतर साक्षीदारांच्या नावे आयसीआयसीआय बँकेत नवीन खाते उघडले. या बँक खात्याला दुसऱ्या इसमाचा मोबाईल क्रमांक जोडला. तक्रारदार आणि साक्षीदार यांना काही कळू न देता आरोपींनी ऑनलाइन खेळाच्या माध्यमातून लाखो रुपयांची उलाढाल या खात्यांमधून केली.
हेही वाचा – डोंबिवलीतील गावदेवी मंदिराजवळील इमारत नियमानुकूल करण्याची रहिवाशांची मागणी
धीरेश पाटील यांना हा प्रकार समजताच त्यांनी बँकेतून या प्रकाराची माहिती घेतली. त्यावेळी त्यांना आपल्या व इतरांच्या खात्यांमधून अशाप्रकारे लाखो रुपयांची उलाढाल आरोपींनी केल्याचे समजले. आपल्या अपरोक्ष बँक खात्याचा नियमबाह्य वापर केल्याबद्दल धीरेश यांनी मानपाडा पोलीस ठाण्यात तक्रार केली आहे.