पालघर आणि डहाणू तालुक्यात शेतकऱ्यांची फसवणूक

पालघर आणि डहाणू तालुक्यांतील बागायतदार शेतकऱ्यांची खत व कीटकनाशके विक्रेत्यांकडून फसवणूक होत आहे. सेंद्रिय खते असल्याचे सांगून विक्रेते शेतकऱ्यांना रासायनिक घटक असलेली खते आणि कीटकनाशके विकत असल्याचे दिसून आले आले. या खते व कीटकनाशकांबाबत काहीच माहिती नसल्याने अनेक शेतकऱ्यांची फसवणूक होत असून शेतीवरही त्याचा परिणाम होत आहे.

बोईसर आणि वाणगाव पट्टय़ातील कुरगाव, परनाळी, दहिसर, चिंचणी, वाणगाव, बावडा, केतखाडी अशा अनेक भागात बागायती शेती मोठय़ा प्रमाणात केली जाते. या भागात तिखट मिरची, भोपळी मिरची, टोमॅटो, वांगी, काकडी अशा अनेक प्रकारच्या फळभाज्यांचे उत्पन्न घेतले जाते. प्रामुख्याने येथे तिखट मिरची आणि भोपळी मिरचीचे उत्पादन मोठय़ा प्रमाणात होते. मात्र चुकीची खते व कीटकनाशकांमुळे  शेतकऱ्यांच्या उत्पादनावर त्याचा विपरीत परिणाम होऊ  लागला आहे. या संपूर्ण भागातील शेतकरी औषधे घेण्यासाठी वाणगाव येथील विक्रेत्यांकडून औषधे घेत असतात. परंतु शेतकऱ्यांना सेंद्रिय खते व कीटकनाशके असल्याचे भासवून बाजारात येणारी नवनवीन कीटकनाशके माथी मारली जातात. रासायनिक घटक असलेली खते आणि कीटकनाशके शेतकऱ्यांच्या माथी मारली जात असल्याने त्यांची फसवणूक होत आहे.

वाणगाव भागातील दुकानदारांकडे सेंद्रिय खते- कीटकनाशके विक्रीबाबतचे परवाने नाहीत, तरीही त्याची विक्री करत असल्याचे ते सांगत आहेत. प्रत्यक्षात रासायनिक खते व कीटकनाशकांचीच विक्री केली जात आहे. विशेष म्हणजे दुकानदारांकडून सेंद्रिय औषधांची देयकेही शेतकऱ्यांना दिली जात नसल्याचे दिसून आले आहे. या विक्रेत्यांकडे कृषी अधिकाऱ्यांचेही दुर्लक्ष होत असल्याचा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. शेतकऱ्यांना मार्गदर्शन आणि पिकांवरील रोगांची पाहणी करण्यासाठी कृषि अधिकारी येत नसल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.

रोगांवर नियंत्रण नाही

बागायती शेतीत पिकांवर रासायनिक खतांच्या वापरामुळे मोठय़ा प्रमाणात निर्माण होणाऱ्या स्थ्रिप्स या रोगावर नियंत्रण येत नसल्याने शेतकरी चिंतेत आहे. अनेक औषधांचा वापर करूनही रोग आटोक्यात येत नसल्याने काही शेतकऱ्यांनी संपूर्ण जागेवर रोपटे काढून टाकण्यास सुरुवात केली आहे. त्यातच भुरी रोगाचा प्रादुर्भावही अधिक प्रमाणात झाल्याने औषधांचा मारा केला तरी आठ दिवसानंतर पुन्हा रोगाचा प्रादुर्भाव होत आहे.

सेंद्रिय कीटकनाशक व खतांच्या बाबतीत शेतकऱ्यांनी डहाणू येथील कार्यालयात विशिष्ट दुकानदारांची तक्रार दिली तर त्यानुसार नमुने तपासणीसाठी पाठवून कारवाई करता येईल. खतांच्या छापील रकमेपेक्षा अधिक रक्कम जर कोणी घेत असेल तर कारवाई केली जाईल.  -संतोष पवार, तालुका कृषी अधिकारी, डहाणू

विक्रेते सेंद्रिय खते व कीटकनाशकांच्या नावाखाली बोगस कीटकनाशके-खते विकत आहेत. गरीब आदिवासी शेतकऱ्यांना त्याबाबत माहिती नसल्याने दुकानदार जे देईल त्याचा वापर शेतकरी शेतात करतात. यामुळे पिकांवर विपरीत परिणाम होतो.   -भरत वायडा, आदिवासी शेतकरी, वाणगाव