डोंबिवली येथील गांधीनगर भागातील प्रोबेस एंटरप्रायझेस कंपनीतील दुघर्टनेच्या पाश्र्वभूमीवर नागरिकांच्या जीवितास धोका निर्माण करणारे कारखाने शहराबाहेर स्थलांतरित करण्यासाठी योग्य पावले उचलण्याचा प्रयत्न केला जाईल, असे आश्वासन ठाणे जिल्ह्य़ाचे पालकमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्थानिक रहिवाशांना दिले. तसेच अशा घटनांची भविष्यात पुनरावृत्ती होऊ नये म्हणून सुरक्षिततेचे उपाय अधिक काटेकोरपणे राबविण्यात येतील आणि वेळप्रसंगी त्यासाठी कठोर कायदेही करण्यात येतील, असेही त्यांनी या वेळी स्पष्ट केले. औद्योगिक पट्टय़ाच्या मुखाशी गृहसंकुलांना परवानगी देऊ नका अशी मागणी वारंवार करूनही त्याकडे दुर्लक्ष केले जाते आणि दुर्घटना घडली की औद्योगिक पट्टा स्थलांतरित करण्याची भाषा केली जाते, अशी टीका या भागातील औद्योगिक संघटनांमार्फत करण्यात आली आहे.
डोंबिवली पूर्व एमआयडीसी परिसरातील गांधीनगरजवळ प्रोबेस एंटरप्रायझेस कंपनीत गुरुवारी भीषण स्फोट झाल्यानंतर पालकमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री सुभाष देसाई यांनी घटनास्थळी धाव घेतली. जखमींवर डोंबिवली तसेच परिसरातील एम्स, शांतीहोम, रुक्मिणी, नेपच्यून आणि आयकॉन या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू आहेत. तिथे जाऊन पालकमंत्री शिंदे आणि उद्योगमंत्री देसाई या दोघांनी जखमींची भेट घेऊन विचारपूस केली. त्या वेळी पीडितांना सर्वतोपरी मदत दिली जाईल, असे शिंदे यांनी स्पष्ट केले.
तसेच स्फोट नेमका कशामुळे झाला, याची सविस्तर चौकशी करण्यात येणार असून त्यामध्ये दोषी आढळणाऱ्यांविरोधात कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी सांगितले.

Story img Loader