बदलापूर : बदलापूर शहरातील औद्योगिक वसाहतीतून तयार होणारे सांडपाणी फॉरेस्ट नाका येथे वाहिनीच्या माध्यमातून नेले जाते. ही वाहिनी शुक्रवारी दुपारी फुटल्याने बदलापूर पूर्व भागात कर्जत मार्गावर रासायनिक सांडपाणी वाहत होते. पाण्याचा प्रवाह मोठा असल्याने रस्त्यावरून जाणाऱ्या वाहनचालकांना आणि पादचाऱ्यांना याचा फटका बसला. हे सांडपाणी थेट नाल्यामार्गाने उल्हास नदीत मिसळले. गेल्या काही वर्षात सातत्याने ही सांडपाण्याची वाहिनी फुटत असल्याने नागरिकांना त्रासाला सामोरे जावे लागते.

बदलापूर पूर्वेतील औद्योगिक वसाहतीतील कंपन्यांमधून निघणारे रासायनिक सांडपाणी अंबरनाथ येथील प्रक्रिया केंद्रापर्यंत वाहिनीच्या माध्यमातून नेले जाते. पूर्व भागातून कर्जत महामार्गाशेजारून सुमारे सहा किलोमीटर लांबीची ही वाहिनी आहे. मात्र गेल्या काही वर्षात ही रासायनिक सांडपाणी वाहून नेणारी वाहिनी सातत्याने फुटत असल्याचे समोर आले आहे. शुक्रवारी अशाच प्रकारे दुपारच्या सुमारास कर्जत मार्गावर ही वाहिनी फुटली. वाहिनी फुटल्याने परिसरात रासायनिक सांडपाणी पसरले होते. पाण्याचा दाब इतका होता की पाच ते सहा मजल्याच्या इमारती इतका पाण्याचा फवारा उडत होता. त्यामुळे मोठ्या प्रमाणावर पाणी रस्त्य़ावर पसरले होते. पाण्याचा प्रवाह अधिक असल्याने कर्जत मार्गावरून जाणाऱ्या वाहनांवर हे पाणी उडत होते. तर दुचाकीस्वारांची आणि पादचाऱ्यांची एकच धावपळ उडाली.

याची माहिती मिळाल्यानंतर महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या वतीने सांडपाण्याचा प्रवाह थांबवण्यात आला. सातत्याने वाहिनी फुटीच्या घटनांमुळे नागरिकांत संतापाचे वातावरण आहे. विशेष म्हणजे हेच सांडपाणी शेजारच्या नाल्यामार्गे उल्हास नदीला मिसळते आहे. त्यामुळे उल्हास नदीच्या प्रदुषणातही वाढ होण्याची भीती व्यक्त होते आहे.

प्रदूषणात भर

उल्हास नदीत सांडपाणी मिसळत असल्याने उल्हास नदीच्या पात्रात जलपर्णीचा खच पडला आहे. त्यावर नियंत्रण मिळण्यासाठी आवश्यक त्या उपाययोजना राबविल्या जात आहेत. त्यातच या बदलापूर औद्योगिक वसाहतीतील प्रक्रिया केलेले सांडपाणी थेट खाडीत सोडण्यासाठी कोट्यवधी रुपये खर्चून एक वाहिनी टाकण्यात आली आहे. ही वाहिनी बदलापूरहून अंबरनाथ आणि तेथून कल्याण पर्यंत नेण्यात आली आहे. मात्र ही वाहिनी बदलापूर शहरातच फुटत असल्याने वाहिनीचा हेतूच फोल ठरत असल्याची चर्चा रंगली आहे. यापूर्वीच्या जलवाहिनी फुटीच्या घटनेत शेजारच्या घरांमध्येही सांडपाणी शिरले होते. आता पुन्हा ही वाहिनी फुटल्याने महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाच्या कारभारावर संताप व्यक्त होतो आहे.