लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : छत्रपती शिवाजी महाराज यांचे विचार, धोरण, पराक्रम आणि दैदिप्यमान इतिहास जगासमोर मांडण्यासाठी भिवंडी येथील मराडे पाडा येथे छत्रपती शिवाजी महाराज यांचे मंदीर उभारण्यात आले आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे राज्यातील हे पहिलेच भव्य मंदीर असावे. छत्रपती शिवाजी महाराज यांची मुर्ती अयोध्यातील श्री रामाची मूर्ती घडविणारे सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आली आहे. गडकिल्ल्यांच्या धर्तीवरील देशातील विविध मंदिराच्या शैलींचा प्रभाव असलेल्या या मंदिराचे क्षेत्रफळ अडीच हजार चौरस फूट असून तटबंदी पाच हजार चौरस फूट इतकी आहे, हे मंदीर चार एकर जमिनीवर विस्तारलेले आहे. १४ मार्चला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या मंदीराचे लोकार्पण होणार आहे.
शिवक्रांती प्रतिष्ठान ट्रस्ट या संस्थेचे संस्थापक अध्यक्ष व मुख्य विश्वस्त डॉ. राजू चौधरी यांच्या वतीने हे मंदीर उभारण्यात आले आहे. या मंदीराच्या माध्यमातून पर्यटन विकास होऊन भूमिपुत्रास रोजगार देखील प्राप्त होणार आहे. मंदिरासाठी जवळपास सात ते आठ कोटी रुपये खर्च करण्यात आला आहे. हा सर्व खर्च प्रतिष्ठानच्या वतीने व काही खर्च लोकवर्गणीने करण्यात आला आहे. या सर्व मंदिराची रूपरेखा ह.भ.प डॉ. कैलास महाराज निचिते यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची निर्मिती अभियंता व वास्तुविशारद विजयकुमार पाटील भिवंडी यांनी केली आहे. हे मंदीर हुबेहुब गडकिल्ल्यांच्या धर्तीवर उभारण्यात आले आहे. मंदिराभोवती तटबंदीसह बुरुज, महाद्वार आहे. तसेच मंदिर प्रवेशद्वार उंची ४२ फूट असून एकूण पाच कळस, गाभाऱ्यावर ४२ फूट सभा मंडप, सभा भोवती चार कोपऱ्यावर गोलाकार बुरुज, टेहळणी मार्ग हे सर्व प्रत्यक्ष दगडाच्या तोडी घडवून उभारणी करण्यात आली आहे. तटबंदीच्या आत ३६ विभाग असून त्यावर भव्य शिल्पे उभारण्यात आली आहेत. या माध्यमातून इतिहास दर्शन घडविण्यात येणार आहे.
सर्व खांब कोरीव, महिरपी कमानी आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज यांची मूर्ती साडे सहा फूट असून ती अयोध्यातील रामाची मूर्ती घडविणाऱ्या सुप्रसिद्ध शिल्पकार अरुण योगीराज यांच्या हस्ते घडविण्यात आली आहे. या मंदिराचा लोकार्पण सोहळा शिवजयंतीच्या तिथीनुसार शुक्रवारी, १४ मार्चला पार पडणार आहे. त्यानुसार आध्यात्मिक दिन, संस्कृतिक दिन, ऐतिहासिक दिन,व छत्रपती मूर्तींची प्राणप्रतिष्ठा असे १७ मार्च पर्यंत कार्यक्रम सुरू राहणार आहेत. या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे प्रमुख उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गक्षाचे प्रमुख शरद पवार, खासदार उदयनराजे भोसले यांच्यासह मंत्री, लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित राहणार असल्याचे राजू चौधरी, मंदिराचे अभियंता विजयकुमार पाटील आणि समन्वयक मोहन पाटील यांनी पत्रकार परिषदेत सांगितले.