लोकसत्ता प्रतिनिधी

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

ठाणे : सध्या सिनेमागृहात ‘छावा’ चित्रपटाने धुमाकुळ घातला आहे. हा चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक मोठ्या संख्येने गर्दी करीत आहेत. शनिवार सुट्टीचा दिवस असल्याने ठाण्यातील कोरम मॉलमध्ये अनेक प्रेक्षक ‘छावा’ चित्रपट पाहायला आले असतानाच तांत्रिक बिघाडामुळे चित्रपट सुरू होण्यास विलंब झाला. सुमारे अर्धा ते पाऊण तास होऊनही चित्रपट सुरू झाला नसल्याने प्रेक्षकांमध्ये संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. तर, काही वेळात चित्रपट सुरू करण्यात येईल, अशी उत्तरे प्रशासनाच्यावतीने देण्यात येत आहेत.

छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी सिनेमागृहात प्रेक्षक गर्दी करत आहेत. हा चित्रपट एक आठवड्यापुर्वी प्रदर्शित झाला. प्रदर्शित होऊन एक आठवडा उलटला असला तरी प्रेक्षकांचा उत्साह कमी झाला नसल्याचे दिसून येते. ‘छावा’ चित्रपटात विकी कौशल याने छत्रपती संभाजी महाराजांची भूमिका साकारली आहे. तर, दक्षिण भारतीय चित्रपटातील सुप्रसिद्ध अभिनेत्री रश्मिका मंदानाने महाराणी येसूबाईंच्या भूमिकेत असल्याचे दिसून येत आहे. तर अक्षय खन्ना औरंगजेबाची भुमिका साकारत असून मराठी अभिनेता संतोष जुवेकर याने रायाजींचे पात्र साकारले आहे. या चित्रपटत महाराजांची जीवनकथा सांगण्यात आली आहे. छावा चित्रपट पाहून प्रेक्षकांसोबतच अनेक कलाकारांनी विविध प्रतिक्रिया व्यक्त केल्या आहेत.

या चित्रपटाने शुक्रवार, २१ फेब्रुवारी पर्यंत जगभरात दमदार कमाई केली आहे. त्यातच आज, शनिवार हा सुट्टीचा वार असल्याने प्रेक्षकांनी चित्रपटगृह गाठल्याचे दिसून आले. अनेकजण आपल्या मित्रमैत्रिणी, कुटुंबासोबत ‘छावा’ चित्रपट पाहण्यासाठी ठाण्यातील कोरम मॉल येथे दुपारी दाखल झाले. यावेळी सुमारे ३०० ते ४०० प्रेक्षक जमले होते. चित्रपट पाहण्यासाठी प्रेक्षक आतुर होते. मात्र, अर्धा ते पाऊण तास उलटून गेला असला तरी चित्रपट सुरू होत नसल्याने प्रेक्षकांमध्ये गोंधळ सुरू झाला. त्यावेळी काही तांत्रिक बिघाडामुळे चित्रपट सुरू होत नसल्याचे कारण समोर आले.

या बिघाडामुळे प्रेक्षकांचा हिरमोड झाला असून संतापाचे वातावरण निर्माण झाले. तर, काही वेळात तांत्रिक बिघाड दुरूस्त करून चित्रपट सुरू करण्यात येईल अशी उत्तरे प्रशासनाच्यावतीने देण्यात येत होती. छावा चित्रपट एकीकडे गाजत असतानाच ठाण्यात झालेल्या गोंधळामुळे प्रेक्षकांकडून संताप व्यक्त केला जात आहे. तर, या चित्रपटादरम्यान झालेल्या तांत्रिक बिघाडामुळे पुढील चित्रपटांनाही विलंब होणार असल्याचे चित्र दिसून येत आहे.