ठाणे – चित्रपट सृष्टीत गाजत असलेला छत्रपती संभाजी महाराज यांच्या जीवनावर आधारित ‘छावा’ चित्रपट पाहण्याची इच्छा सर्वांचीच आहे. परंतू, अनेक कुटूंबांना आर्थिक परिस्थिती अभावी सिनेमागृहात जावून चित्रपट पाहणे शक्य होत नाही. अशाच, कुटूंबातील मुलींसाठी श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास समितीच्या वतीने महिला दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील इटरनिटी मॉलमध्ये रविवारी छावा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. या प्रक्षेपणासाठी महापालिका शाळेतील, समर्थ भारत व्यासपीठ अभ्यासिकेतील तसेच काही महाविद्यालयातील ६०० हून अधिक मुलींचा सहभाग होता.

ठाणे शहरातील श्रीकौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित नववर्षे स्वागत यात्रेचे यंदा रौप्य महोत्सवी वर्षे आहे. या यात्रेत नागरिकांचा सहभाग वाढविण्यासाठी विशेष करुन तरुणांचा सहभाग वाढविण्याकरिता आयोजकांकडून विशेष प्रयत्न करण्यात येत आहे. जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहोचविण्यासाठी आयोजक शहरातील महाविद्यालयांशी समन्वय साधत असून महाविद्यालयांमध्ये विविध व्याख्यानांचे आयोजन करत आहेत. तसेच युवा दिना निमित्त न्यासाकडून युवा दौडचे आयोजन देखील करण्यात आले होते. या युवादौडमध्ये मोठ्या संख्येने युवक सहभागी झाले होते. तर, महिला दिनाचे औचित्य साधून न्यासाने खास विद्यार्थीनींसाठी छावा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण आयोजित केले होते. बहुतेकदा गरिब कुटूंबातील मुलांना आर्थिक परिस्थिती अभावी सिनेमागृहात येऊन सिनेमा पाहणे शक्य होत नाही. अशा विद्यार्थींनीना छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनावर आधारित असलेला छावा चित्रपट पाहता यावा आणि त्यांना देखील महाराजांचा इतिहास समजावा या उद्देशाने छावा चित्रपटाचे मोफत प्रक्षेपण आयोजित करण्यात आले होते. यामध्ये ६०० हून अधिक विद्यार्थिनींचा सहभाग होता. ठाणे शहरातील महापालिकेच्या शाळेतील, समर्थ भारत व्यासपीठ अभ्यासिकेतील तसेच ज्ञानसाधना, केबीपी, ठाकूर आणि आनंद विश्व गुरुकुल अशा महाविद्यालयातील विद्यार्थींनी हा चित्रपट पाहण्यासाठी आले होते, अशी माहिती न्यासाचे कार्याध्यक्ष संजीव ब्रह्मे यांनी दिली. यावेळी छावा चित्रपटातील कलाकारांना तलवारबाजी आणि युद्धकौशल्याचे प्रशिक्षण दिलेले प्रणय शेलार उपस्थित होते. त्यांनी यावेळी विद्यार्थ्यांना चित्रीकरणा दरम्यानचे काही किस्से सांगितले. तसेच महिला दिनानिमित्त विविध क्षेत्रातील महिलांचाही यावेळी मेजर मोहिनी कुलकर्णी यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

यावेळी न्यासाचे विश्वस्त उत्तम जोशी, अरविंद जोशी, संजीव ब्रह्मे, डॉ. अश्विनी बापट, निमंत्रक तनय दांडेकर, सहनिमंत्रक निखिल सुळे, कार्यकारिणी सदस्य वंदना विद्वांस, शंतनू खेडकर, अंजली ढोबळे, निशिकांत महांकाळ, कुमार जयवंत आणि शिवराज्याभिषेक समिती कार्यकर्ते उपस्थित होते.

Story img Loader