ठाणे : येथील बारा बंगला परिसरातील ठाणे पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे शासकिय निवासस्थानात पाळलेल्या कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे मंगळवारी रात्री उशिरा समोर आले आहे. यावर खबरदारीचा उपाय म्हणून जिल्हा पशू संवर्धन विभागाच्या माध्यमातून बंगल्याच्या एक किलोमिटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. बर्ड फ्लूची लागण झालेल्या कोंबड्यांचे निवासस्थान हे पोलीस आयुक्तांचे असल्याचे माहिती सूत्रांनी दिली असून, याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले नाही. तर हा फैलाव केवळ तेवढ्या एका भागापूरताच मर्यादित असून त्याचा इतरत्र कुठेही फैलाव झाला नसल्याचे पशू संवर्धन विभागाच्या अधिकाऱ्यांनी सांगितले आहे.

हेही वाचा : घोडबंदर भागासाठी मिळणार आणखी शंभर वाहतूकसेवक, ठाणे महापालिका आयुक्तांचे बैठकीत संकेत

ठाणे शहरातील बारा बंगला परिसरात पोलीस आयुक्त आशुतोष डुंबरे यांचे शासकिय निवासस्थान आहे. या बंगल्याच्या आवारात ४० ते ५० कोंबड्या पाळल्या होत्या. यातील काही कोंबड्यांची मागील आठवड्यापासून अचानक मरतुक सुरू झाली. यामुळे पक्ष्यांना कोणतीतरी बाधा झाले असल्याचे निदर्शनास आले असता तातडीने जिल्हा पशू संवर्धन विभागाशी संपर्क साधण्यात आला. पशू संवर्धन विभागाने मेलेल्या पक्ष्यांचे काही नमुने चाचणीसाठी पाठविले. याचा अहवाल मंगळवारी रात्री उशिरा मिळाला. यामध्ये कोंबड्यांना बर्ड फ्ल्यूची लागण झाल्याचे निष्पन्न झाले. जिल्हा पशू संवर्धन विभागाने खबरदारीचा उपाय म्हणून बारा बंगला परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट केल्या आहेत. उच्चभ्रू वस्तीचा भाग म्हणून ओळखल्या जाणाऱ्या या परिसरात कोंबड्या अधिक नसल्याने येथे आढळून आलेल्या सुमारे २० कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. तर बर्ड फ्लूची लागण झालेल्या कोंबड्यांचे निवासस्थान हे पोलीस आयुक्तांचे असल्याचे माहिती सूत्रांनी दिली असून, याबाबत पशुसंवर्धन विभागाकडून स्पष्ट करण्यात आले नाही.

बर्ड फ्लुची लागण झाल्याचे निष्पन्न होताच एक किलोमीटर परिसरातील सर्व कोंबड्या नष्ट करण्यात आल्या आहेत. याचा शहरात किंवा आसपासच्या परिसरात इतरत्र कुठेही फैलाव झालेला नाही.

डॉ.वल्लभ जोशी, उपायुक्त, जिल्हा पशू संवर्धन विभाग

Story img Loader