ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्यावतीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या भव्य सत्कार सोहळ्याचे आज, रविवारी ठाण्यात आयोजन करण्यात आले आहे. यावेळी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते अत्याधुनिक रुग्णवाहिकेचे लोकार्पण करण्यात येणार आहे. तसेच चेकनाका कोपरी ते हायलँड मैदान ढोकाळी अशी रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे.

हेही वाचा- डोंबिवलीत २०० उत्तर भारतीय मनसेमध्ये

ठाण्यातील हायलँड मैदानात रविवार, १६ ऑक्टोबर २०२२ रोजी संध्याकाळी ४ वाजता या सत्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. ऑल इंडिया बंजारा सेवा संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. शंकर पवार यांनी या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. या सत्कार सोहळ्यानिमित्ताने दुपारी ३ वाजता चेकनाका कोपरी ते हायलँड मैदान ढोकाळी अशी रिक्षा रॅली काढण्यात येणार आहे. या रॅलीमध्ये ३०० रिक्षा आणि २०० दुचाकीचा समावेश असणार आहे. या सोहळ्यास कॅबिनेट मंत्री संजय राठोड यांची प्रमुख उपस्थिती असणार आहे. सोबत प्रमुख पाहुणे म्हणून केंद्रीय पंचायत राज्यमंत्री कपिल पाटील, गुलबर्गा लोकसभा मतदार संघाचे खासदार डॉ. उमेश जाधव उपस्थित राहणार आहेत.

हेही वाचा- शाळा, महाविद्यालय परिसरात पोलीस गस्त वाढवा ; पालकमंत्री शंभूराज देसाई यांचे ठाणे पोलिसांना आदेश

या मेळाव्याकरिता राज्यभरातील बंजारा समाज मोठ्या संख्येने येणार आहे. गरीब कामगार आणि बंजारा समाजाचे नागरिकांना आरोग्य सुविधा वेळेत मिळावी यासाठी अत्याधुनिक रुग्णवाहिका समाजासाठी अर्पण करण्यात येणार असून त्याचे लोकार्पण मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांच्या हस्ते करण्यात येणार आहे. या कार्यक्रमाच्या निमित्ताने देशातील विविध भागातून ठाणे आणि मुंबईमध्ये स्थायिक झालेल्या बंजारा समाजाचे प्रश्न आणि त्यांना येणाऱ्या विविध समस्या यावर प्रकाश टाकण्यात येणार आहे.

हेही वाचा- डोंबिवलीत बालभवनमध्ये लाकडी चित्रांच्या प्रदर्शनाला प्रारंभ

मुख्यमंत्री शिंदे यांचा बालेकिल्ला असलेल्या ठाणे शहरात त्यांचा हा दुसऱ्यांदा भव्य नागरी सत्कार होत आहे. यापूर्वी ठाण्यातील सामाजिक आणि सांस्कृतिक क्षेत्रातील संस्थांनी एकत्रित येऊन त्यांचा नागरी सत्कार केला होता. त्यापाठोपाठ आता ऑल इंडिया बंजारा सेवा संघाच्या वतीने त्यांचा सत्कार होत आहे.

Story img Loader