बदलापूरः किसन कथोरे पाचव्यांदा आमदार झाले तरी मंत्री झाले नाहीत. पण मंत्री जे करू शकत नाहीत ते कथोरे करू शकतात. कथोरे मंत्र्यांपेक्षा कमी आहेत काय, असे सांगत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आमदार किसन कथोरे योग्यवेळी मंत्री होतील असे वक्तव्य केले. उल्हास नदी किनारी छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणाप्रसंगी देवेंद्र फडणवीस बोलत होते. कथोरे यांच्यामागे प्रत्यक्ष मुख्यमंत्री उभा आहे, असेही फडणवीस यावेळी म्हणाले.

मुरबाड विधानसभा मतदारसंघाचे आमदार किसन कथोरे यंदाच्या विधानसभा निवडणुकीत पाचव्यांदा निवडून आले. त्यामुळे यंदा कथोरे यांच्या गळ्यात मंत्रीपदाची माळ पडेल अशी आशा होती. मात्र जिल्ह्यात एकनाथ शिंदे यांच्यासह प्रताप सरनाईक आणि गणेश नाईक यांनी मंत्रीपद मिळाले. त्यामुळे कथोरे समर्थकांमध्ये नाराजी पसरली होती. कथोरे यांनी मंत्रीपदासाठी प्रयत्नही केले होते. त्यामुळे कथोरे यांना ज्येष्ठतेनुसार मंत्रीपद मिळेल असे मानले जात होते. मात्र यंदाही त्यांना मंत्रीपद मिळू शकले नाही. मंगळवारी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उल्हास नदी किनारी उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या अश्वारूढ पुतळ्याच्या अनावरणासाठी बदलापुरात आले होते. आमदार किसन कथोरे यांच्या माध्यमातून उभ्या राहिलेल्या या पुतळ्याच्या अनावरणानंतर भाजपची सभा झाली. यावेळी लाडक्या बहिणींच्या वतीने देवेंद्र फडणवीस यांचा सत्कार करण्यात आला. याप्रसंगी मंचावर कथोरे यांना मंत्रीपदाची आशा होती, अशा भावना भाजपच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या. त्यावर मुख्यमंत्री फडणवीस काय बोलतील अशी सर्वांना उत्सुकता लागली होती. कथोरे यांच्या मंत्री पदाच्या मुद्द्यावर भाजपकडून अधिकृत असे वक्तव्य आले नव्हते. त्यामुळे फडणवीसांच्या वक्तव्याकडे सर्वांचे लक्ष लागून होते.

अध्यक्षीय भाषण करताना मुख्यमंत्री फडणवीस यांनी इतर सर्व विषयांसह कथोरे यांच्या मंत्रीपदाच्या मुद्द्यावरही भाष्य केले. तुम्ही कथोरे यांना मंत्र्यांपेक्षा कमी समजू नका. कथोरे जे करू शकतात ते मंत्रीही करू शकत नाहीत. आणि हा मुख्यमंत्री प्रत्यक्ष कथोरे यांच्यामागे उभा आहे. त्यामुळे तेच मुख्यमंत्री आहेत, असे वक्तव्य फडणवीस यांनी केले. कथोरे योग्यवेळी मंत्री होतील, असेही फडणवीस यावेळी म्हणाले. त्यामुळे कथोरे यांच्या मंत्रीपदाबद्दल फडणवीस यांनी संकेत दिल्याचे बोलले जाते.

Story img Loader