बदलापूरः छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिर असलेल्या बदलापुरात शिवरायांचा भव्य पुतळा बसवण्यात आला आहे. येत्या १८ फेब्रुवारी रोजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते या पुतळ्याचे अनावरण केले जाणार आहे. बुधवारी शहराच्या पूर्व भागातून निघालेल्या भव्य मिरवणुकीत नागरिक सहभागी झाले होते. साहसी खेळ, पारंपरिक वेशातील मुले मुली, ढोलताशा पथक अशी ही भव्य मिरवणूक शहराच्या पूर्व भागातून उल्हास नदीपर्यंत नेण्यात आली.

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा
Skip
या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

बदलापूर शहराला छत्रपती शिवाजी महाराज यांनी भेट दिल्याचा दावा अनेकदा केला जातो. स्वातंत्र्यपूर्व काळात लोकमान्य टिळकांनी जातीय सलोख्यासाठी सुरू केलेल्या शिवजयंती आणि गणेशोत्सवाला बदलापुरातून उत्स्फुर्त प्रतिसाद मिळाला. बदलापूर गावात १९२० पासून शिवजयंती आणि सार्वजनिक गणेशोत्सव साजरा केला जातो. छत्रपती शिवाजी महाराजांचे मंदिरही याच बदलापूर गावात आहे. एकेकाळी डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनीही येथील शिवजयंतीसाठी हजेरी लावली होती, असा इतिहास आहे. त्यामुळे या बदलापूर शहरात त्याच बदलापूर गावाच्या प्रवेशद्वारावर छत्रपती शिवाजी महाराजांचा भव्य पुतळा उभारण्यासाठी स्थानिक आमदार किसन कथोरे आग्रही होते. विधानसभा निवडणुकीपूर्वी या पुतळ्यासाठी नइधी मंजूर झाला होता. मात्र पुतळा बनवण्यासाठीचा वेळ मोठा असल्याने विधानसभेनंतर पुतळ्याचे काम पूर्ण झाले. सोमवारी हा पुतळा पुणे येथील कार्यशाळेतून बदलापुरकडे निघाला होता. असंख्य अडचणींचा सामना करत बुधवारी हा पुतळा बदलापुर शहरात दाखल झाला.

बदलापूर पूर्वेतील जुन्या नगरपालिका इमारतीपासून या शिवाजी महाराजांच्या पुतळ्याची मिरवणूक काढण्यात आली. बुधवारी सायंकाळी ढोल ताशा, लेझीम पथक, शिवकालीन वेशभूषेतील कलाकार मंडळी यांच्या उपस्थितीत मिरवणुकीला सुरूवात झाली होती. बदलापूरकरांनी मोठ्या जल्लोषात या शिवशिल्पाचे स्वागत केले. बदलापूरच्या उल्हासनदी किनारी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर १८ फेब्रुवारीला राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या शुभहस्ते या पुतळ्याचे अनावरण होणार आहे. तर, बदलापूरच्या भूमीत शिवरायांचे पद स्पर्श झाले आहे त्या गावच्या वेशीवर महाराजांचा अश्वारूढ पुतळा उभारण्याची इच्छा आज पूर्णत्वकडे येत आहे. बदलापूरकरांनाही या आगमन सोहळ्याला मोठ्या संख्येने उपस्थित राहून उत्स्फूर्त प्रतिसाद दिल्याबद्दल सर्व शिवप्रेमींचे आभार मानतो, अशी प्रतिक्रिया आमदार किसन कथोरे यांनी दिली आहे.