ठाणे : लोकसभा निवडणुकीत सरकारविरोधात काम करणाऱ्या काही स्वयंसेवी संस्था आणि महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी पध्द्तशीरपणे खोटे कथानक नागरिकांमध्ये पोहचविले. त्यामुळे नक्षल केवळ गडचिरोलीत नसून हे अर्बन नक्षल आता काही स्वयंसेवी संस्थांमध्ये शिरले असल्याचा आरोप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात महायुतीच्या मेळाव्यात बोलताना केला.
ठाणे येथील टीप टॉप प्लाझा येथे कोकण पदवीधर मतदार संघातील महायुतीचे उमेदवार निरंजन डावखरे यांच्या प्रचाराकरिता रविवारी आयोजित करण्यात आलेल्या महायुतीच्या मेळाव्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केले. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यासह महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मेळाव्यात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी नक्षल केवळ गडचिरोलीत नसून हे अर्बन नक्षल आता काही संस्थांमध्ये शिरल्याचे विधान केले. राज्यात अनेक स्वयंसेवी संस्था चांगल्याप्रकारे काम करत आहेत. पण, काही संस्था सरकारविरोधात काम करीत आहेत. संस्था आणि महाविकास आघाडीचे पदाधिकाऱ्यांनी पध्द्तशीरपणे खोटे कथानक नागरिकांमध्ये पोहचविले. या संस्थांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना हटविण्याचा नारा दिला पण, देशाच्या विकासाचा अजेंडा घेऊन काम करणारे मोदी पुन्हा पंतप्रधान झाले. त्यामुळे त्यांची चिंता आता वाढली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला.
हेही वाचा >>>ठाणे खाडीत दोन जणांनी घेतली उडी, पुरुषाचा मृतदेह सापडला तर महिलेचा शोध सुरू
लोकसभा निवडणुकीत कोकण हा महायुतीचा बालेकिल्ला ठरला आहे. लोकसभा निवडणुकीत खोटे कथानक लोकांपर्यत पोहचवण्यात महाविकास आघाडी यशस्वी ठरली. यामुळे सगळ्याच्या डोळ्यात अंजन घालण्याची वेळ आता आली आहे, असेही ते म्हणाले. लोकसभा निवडणुकीत चारशेचा आकडा पार होणार म्हणून कार्यकर्ते आरामात राहिले आणि तेच निवडणुकीत आम्हाला भोवले, असेही ते म्हणाले.