लोकसत्ता विशेष प्रतिनिधी
ठाणे : काल दिवाळी सुरू झाली, फुसका बार आला पण, वाजलाच नाही. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना यूटर्न घ्यावा लागला, असा टोला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांना लगावला.
माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शनिवारी मुंब्य्राच्या दौऱ्यादरम्यान सरकारवर टीका केली होती. त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी रविवारी ठाण्यात पत्रकारांशी बोलताना प्रतिउत्तर दिले. काल दिवाळी सूरू झाली, फुसका बार आला पण, वाजलाच नाही. आमच्या सर्व कार्यकर्त्यांच्या फटाक्यांचा एवढा आवाज होता की त्यांना यूटर्न घ्यावा लागला, असा टोला मुख्यमंत्री शिंदे यांनी लगावला.
आणखी वाचा-डोंबिवलीतील फडके रोडवर तरूणाईचा उत्साह; गाण्यांच्या कार्यक्रमांनी तरूणाईचा हिरमोड
जनतेसमोर कोणाचेही काहीच चालत नाही. या सर्व लोकांचा माज जनता येत्या निवडणुकीत उतरवेल. ग्रामपंचायत निवडणुकांमध्ये आरोप करणाऱ्यांना, माज करणाऱ्यांना जनतेने ७ व्या नंबरवर पाठवले. उद्या त्यांचा १० वा नंबरसुद्धा लागू शकतो, अशा शब्दात त्यांनी टीका केली. मागील वर्षी देखील मोठ्या उत्साहात दिवाळी पहाट साजरी झाली. आपले सरकार आल्यानंतर सर्व सणांवरील निर्बंध काढून मोठ्या उत्साहात सण साजरे करण्यास सुरुवात केली. तसेच हिंदू सण असेच साजरे होत राहतील, असेही ते म्हणाले.
शिवसेनेच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या दिवाळी पहाट कार्यक्रमांना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपस्थिती लावली. त्यानंतर त्यांनी ठाणे शहरातील सुप्रसिद्ध मामलेदार मिसळचा आस्वाद घेतला. यावेळी आमदार प्रताप सरनाईक, आमदार रवींद्र फाटक, शिवसेनेचे राज्य प्रवक्ते नरेश म्हस्के तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.