ठाणे : राज्यभरात विकासाची कामे सुरू आहेत. त्यामुळे काहींना पोटदुखी होत असल्याची टीका करत अशा लोकांनी ‘स्वर्गीय बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ येथे जाऊन मोफत उपचार घ्यावेत, असा टोला राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी विरोधकांना लगावला आहे.ठाणे जिल्हा मल्टिस्पेशालिटी रुग्णालयाचा भूमिपूजन सोहळा शनिवारी, अक्षयतृतीयेच्या मुहूर्तावर शिंदे यांच्या हस्ते झाला. यावेळी ते बोलत होते. केंद्रीय पंचायत राजमंत्री कपिल पाटील, सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण, आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्यासह आमदार, खासदार उपस्थित होते. आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांनी साखर विषयात डॉक्टरेट मिळविली आहे. त्यामुळे त्यांनी काही लोकांची साखरही वाढवली आहे, असा टोलाही त्यांनी लगावला. या रुग्णालयाच्या जागेवर आता सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. तसेच ठाण्यात कर्करोग रुग्णालयाची निर्मिती केली जाणार आहे. त्यामुळे यापुढे जिल्ह्यातील एकाही रुग्णाला मुंबईत जावे लागणार नाही. या प्रवासादरम्यान होणारे रुग्णमृत्यूचे प्रमाण कमी होईल, असेही ते म्हणाले.
१८ महिन्यांत इमारत पूर्ण..
एखादे रुग्णालय उभारणीसाठी ४ ते ७ वर्षांचा कालावधी लागत होता. तशी व्यवस्था आपल्याकडे होती. या व्यवस्थेत बदल करून वाराणसीच्या धर्तीवर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय इमारत १८ महिन्यांत पूर्ण करण्यात येणार आहे, अशी माहिती सार्वजनिक बांधकाममंत्री रवींद्र चव्हाण यांनी दिली
सोहळय़ासाठी वातानुकूलित मंडप
खारघर येथे महाराष्ट्र भूषण पुरस्कार सोहळय़ादरम्यान झालेल्या दुर्घटनेचा अनुभव लक्षात घेऊन राज्य सरकारने ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालय इमारत भूमिपूजन कार्यक्रमासाठी वातानुकूलित मंडपाची उभारणी करून दुर्घटना होणार नाही, याबाबत काळजी घेतली. एक हजार आसनक्षमता असलेल्या या मंडपामध्ये ‘ओराएक्स पावडर’, पाण्याच्या बाटल्यांसह न्याहारीची सोय केली होती. ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयाच्या जागेवर ९०० खाटांचे मल्टिस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्याच्या भूमिपूजनाचा सोहळा अक्षय्यतृतीयेच्या मुहूर्तावर शनिवारी दुपारी १२ वाजता झाला. यासाठी एक हजार आसन क्षमतेचा मंडप रुग्णालयाच्या मोकळय़ा जागेवर उभारण्यात आला होता. या ठिकाणी ३६ वातानुकूलित यंत्रणा बसविण्यात आल्या होत्या. त्यामुळे मंडपात गारेगार वातावरण होते.