लोकसत्ता प्रतिनिधी
ठाणे : कुठलीही संघटना, कोणताही पक्ष स्वत: प्रायव्हेट लिमीटेड कंपनी म्हणून कोणालाही चालविता येत नाही. मनमानी पद्धतीने निर्णय घेता येणार नाही, हे कालच्या निवाड्यातून स्पष्ट झाले आहे. लोकशाहीमध्ये बहुमताला महत्व असते. लोकसभेत, विधानसभेत आणि पक्ष संघटना बांधणीतही आमचे बहुमत असल्याचे सिद्ध झाले. त्यामुळेच आमच्या बाजूने निकाल लागला. बाळासाहेबांनी काँग्रेसला नेहमी विरोध केला. मात्र त्यांनी काँग्रेसला डोक्यावर बसविले आणि त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले अशी टिका मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उद्धव ठाकरे यांच्यावर केली.
विधानसभा अध्यक्षांनी शिवसेना कुणाची याबाबत दिलेल्या निवाड्यानंतर गुरुवारी ठाण्यातील आनंद आश्रम येथे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत शिवसैनिकांनी जल्लोष केला. यावेळी घेण्यात आलेल्या पत्रकार परिषदेत त्यांनी उध्दव ठाकरे यांच्यावर टिका केली. हा विजय बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या विचारांचा आहे. सर्वसामान्य शिवसैनिकांचा आणि महाराष्ट्रातील जनतेचा हा विजय असल्याचे एकनाथ शिंदे म्हणाले. निवडणुक एकाबरोबर लढवायची आणि निवडणुकीनंतर दुसऱ्याबरोबर केवळ स्वत:च्या स्वार्थासाठी सरकार स्थापन केले. बाळासाहेबांनी काँग्रेसला नेहमी विरोध केला. मात्र त्यांनी काँग्रेसला डोक्यावर बसविले, त्यांच्याबरोबर सत्तेत सहभागी झाले. बाळासाहेबांच्या विचारांना तिलांजली दिली, एका खुर्चीसाठी ज्यांनी बाळासाहेबांचे विचार सोडले त्यांना हा निकाल म्हणजे एक मोठी चपराक असल्याचे शिंदे म्हणाले. आम्ही बाळासाहेब आणि आनंद दिघे यांच्या विचाराचे सरकार स्थापन केले आहे. भरत गोगावले आमचे प्रतोद आहेत, त्यावर शिक्कामोर्तब झाले. आमदार अपात्र करावे ही याचिका अध्यक्षांकडे केली होती. मात्र ती का फेटाळण्यात याची कारणे आम्हाला माहित नाही. विरोधी आमदारांच्या अपात्रेबाबत आम्ही कायदेतज्ञांबरोबर चर्चा करुन पुढील निर्णय घेऊ असेही त्यांनी यावेळी स्पष्ट केले.
आणखी वाचा-डोंबिवलीत फेरीवाल्यांचा कर्मचाऱ्यांना घेराव, ‘ग’ प्रभागातील सततच्या कारवाईने फेरीवाले हैराण
निकालानंतर अध्यक्षांबाबत केलेले भाष्य हे अतिशय खालच्या पातळीवरील होते. सर्वोच्च न्यायालयाला देखील सल्ला देण्याचे काम त्यांनी केले आहे. मात्र आता स्वत:च मालक म्हणून काहीही निर्णय घेता येणार नाही. एकाधिकारशाही, घराणेशाहीला आलेला निर्णय हा चपराक असल्याचेही त्यांनी सांगितले. बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात सर्व घटनेनुसार चालत होते, मात्र त्यांच्या पश्चात मनमानी कारभार सुरू झाला. प्रमुखाने मोठे होऊन पक्ष मोठा होत नसतो. आम्ही बाळासाहेबांची शिवसेना हे नाव मागितले होते. मात्र उध्दव ठाकरे यांनी स्वत:चे नाव दिले यावरुन कळायला हवे त्यांना काय पाहिजे ते असेही ते म्हणाले. शिवसेनेच्या खात्यातील पैसे मागण्याचे पापही त्यांनी केले असेही शिंदे म्हणाले.