ठाणे : लोकसभा आणि विधानसभा निवडणूक आपण महायुती म्हणूनच लढविणार आहोत. आपल्याबरोबर आलेल्या ५० पैकी एकाही आमदाराचा विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ देणार नाही, असा निर्धार मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गुरुवारी व्यक्त केला. ठाण्यात कार्यकर्ता मेळाव्यात ते बोलत होते. 

या बातमीसह सर्व प्रीमियम कंटेंट वाचण्यासाठी साइन-इन करा

 मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या राज्यव्यापी दौऱ्याची सुरूवात ठाण्यातून झाली. यावेळी कार्यकर्ता मेळाव्यात त्यांनी महाविजयाचा संकल्प केला. ‘‘काही वेळा बेरजेचे राजकारण करावे लागते. आपला संकल्प काय आहे, हे महत्त्वाचे आहे. लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीत राज्यातील आतापर्यंतचे सर्व विक्रम मोडून काढायला हवेत. लोकसभेच्या ४५ पेक्षा अधिक जागांवर विजय मिळवायचा आहे. त्यासाठी राज्यातील २१० ते २२० आमदार आतापासून एकत्र आले आहेत. आपल्याबरोबर आलेल्या ५० पैकी एकाही आमदाराचा मी आगामी विधानसभा निवडणुकीत पराभव होऊ देणार नाही. महायुतीचे २०० पेक्षा अधिक आमदार निवडून आणणार, असा विश्वास शिंदे यांनी व्यक्त केला. ‘‘मुख्यमंत्री म्हणून येथे मीच बसलो आहे. तुमच्यावर ओरखडाही उमटणार नाही. तुम्ही काळजी करण्याची आवश्यकता नाही. तुमची चिंता मला आहे’’, अशा शब्दात शिंदे यांनी उपस्थित नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांना आश्वस्त करण्याचा प्रयत्न केला.

केंद्राच्या सहकार्याने राज्याचा विकास

राज्यकर्त्यांनी अहंकार बाजूला ठेवून काम करायचे असते. जनतेचे हित कशात आहे, ते पाहूनच राज्यकर्त्यांनी निर्णय घ्यायला हवेत. केंद्र सरकार आज राज्यासाठी हजारो कोटी रुपयांचा निधी देत आहे. सुरुवातीची अडीच वर्ष केंद्र सरकार मदतीसाठी तयार असायचे, मात्र राज्याकडून काही मागितले जात नव्हते. कितीतरी योजनांचे पैसे केंद्राकडे पडून होते. आता मात्र प्रत्येक पैसा वापरात येत आहे. रखडलेले रेल्वे प्रकल्प आपण सुरु केले. यापुढेही केंद्राच्या मदतीने राज्याचा विकास करू, असे मुख्यमंत्री म्हणाले. मुंबई महापालिकेत इतके वर्षे सत्तेत असणारेच आता मोर्चे काढू लागले, असा टोलाही शिंदे यांनी ठाकरे गटाला लगावला.

‘वर्षां’चे दरवाजे सर्वासाठी खुले ‘वर्षां’वर पूर्वी संचारबंदीसारखी स्थिती असायची. आता ‘वर्षां’चे दरवाजे सर्वसामान्यांसाठी खुले आहेत, असे मुख्यमंत्री म्हणाले. खोके घेणाऱ्यांनी खोक्यांची भाषा करु नये, अशी टीकाही त्यांनी केली.

Thane News (ठाणे न्यूज), Maharashtra News, Marathi News (मराठीतील बातम्या) वाचण्यासाठी डाउनलोड करा लोकसत्ताचं Marathi News App.
Web Title: Chief minister eknath shinde expressed to win all 50 seat at workers meet in thane zws
Show comments