राज्य सरकारकडून दिवाळी साहित्य करण्यासाठी आखलेल्या योजनेतील साहित्याची प्रतीक्षा असतानाच, दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कोपरी- पाचपखडी मतदार संघात मात्र दिवाळी साहित्याचे पाट खुले केल्याचे चित्र आहे. दरवर्षीची परंपरा कायम ठेवत शिंदे यांच्याकडून मतदार संघातील नागरिकांना दिवाळी साहित्याची भेट देण्यात येत आहे. मतदार संघातील पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमार्फत ही भेट घरोघरी पोहचविली जात आहे. त्यामुळे या नागरिकांची दिवाळी गोड होताना दिसत आहे.
राज्यातील दारिद्रय रेषेखालील पिवळी शिधापत्रिका धारकांची दिवाळी गोड, आनंदात जावी म्हणून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महाराष्ट्रातील एक कोटी ८० लाख गोरगरीबांना दिवाळी फराळासाठी लागणारे आवश्यक साहित्य १०० रुपयांमध्ये शिधावाटप दुकानांमध्ये उपलब्ध करुन देण्याची घोषणा पंधरा दिवसांपूर्वी केली होती. परंतु अद्यापही ठाणे जिल्ह्यातील शहरी, ग्रामीण भागातील बहुतांशी शिधावाटप दुकानांमध्ये मुख्यमंत्र्यांची दिवाळी भेट पोहचली नाही. दिवाळीसाठी अवघे दोन दिवस शिल्लक राहिले असतानाही दिवाळी भेट मिळत नसल्याने दुर्बल घटकांमधील नागरिकांमधून नाराजी व्यक्त होत आहे. असे असतानाच दुसरीकडे मात्र मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या कोपरी- पाचपखडी मतदार संघात मात्र दिवाळी साहित्याचे पाट खुले केल्याचे चित्र आहे.
हेही वाचा- मोठी बातमी! मुंबई हायकोर्टाचा ठाकरे गटाला धक्का, ठाण्यात शिंदे गटाचीच ‘दिवाळी पहाट’ होणार
गेल्या काही वर्षांपासून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे स्वतः मतदारांना दिवाळी भेट देतात. दिवाळी साहित्य तयार करण्यासाठी आवश्यक असलेला रवा, बेसन, मैदा, साखर आणि डालडा अशा वस्तूंची पिशवी दिवाळी भेट म्हणून मतदारांना देण्यात येते. मुख्यमंत्री शिंदे यांनी ही परंपरा यंदाही कायम ठेवली असून गेल्या काही दिवसांपासून मतदारांना दिवाळी भेट देण्यास सुरुवात केली आहे. वागळे इस्टेट, कोपरी भागातील माजी नगरसेवक, विभागप्रमुख, शाखाप्रमुख, इतर पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमार्फत ही दिवाळी भेट घरोघरी पोहचविण्यात येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे राज्य सरकारकडून दिवाळी साहित्य करण्यासाठी आखलेल्या योजनेतील साहित्याची प्रतीक्षा असली तरी मुख्यमंत्री शिंदे यांच्या मतदार संघातील नागरिकांची दिवाळी गोड होताना दिसत आहे.