ठाणे – येथील कळवा छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात १८ रुग्णांचा उपचारादरम्यान दुर्दैवी मृत्यू झाला ही वस्तुस्थिती आहे. या घटनेची चौकशी करण्यासाठी त्वरित आरोग्य संचालकांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली असून २५ ऑगस्टपर्यंत या समितीचा अहवाल सादर करण्याच्या सक्तीच्या सूचना दिली असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. या रुग्णालयात शेकडो रुग्णांवर नियमितरीत्या उपचार केले जातात. या घटनेमुळे येथील डॉक्टरांचे आणि वैद्यकीय कर्मचाऱ्यांचे मानसिक खच्चीकरण करू नका. विरोधकांनी या घटनेचे राजकारण करण्याऐवजी याबाबत कोणत्या उपाययोजना राबविण्यात येतील याच्या सूचना करण्याचे आवाहन यावेळी मुख्यमंत्र्यांनी केले.
ठाणे येथील कळवा रुग्णालयात रविवारी २४ तासात तब्बल १८ रुग्णांचा मृत्यू झाल्याची घटना घडली. यामुळे संपूर्ण ठाणे जिल्हा हादरला असून जिल्ह्याच्या आरोग्य व्यवस्थेवर प्रश्नचिन्ह उभे राहिले होते. या घटनेची दखल घेत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सोमवारी रात्री उशिरा कळवा रुग्णालयाला भेट देत संपूर्ण घटनेचा आढावा घेतला. यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधताना ही माहिती दिली.
हेही वाचा >>>डोंबिवली : शिळफाटा चौकात वाहतूक सेवकांच्या उपद्रवाने प्रवासी हैराण
कळवा रुग्णालयात येणाऱ्या रुग्णांना डॉक्टर उपचार न देता परत पाठवत नाहीत. रूग्णालयात ५०० बेडची सुविधा उपलब्ध असतानाही या ठिकाणी ५८८ रुग्ण उपचार घेत आहेत. रुग्णालयाच्या या बाजूचा ही विचार करायला हवा. असे मत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी यावेळी व्यक्त केले. कळवा रूग्णालयात डॉक्टर, आरोग्यसेवक सर्व वैद्यकीय कर्मचारी अहोरात्र काम करत आहेत त्यांचे मानसिक खच्चीकरण होता कामा नये, याकडे लक्ष देणं गरजेचं आहे. असे मत मुख्यमंत्र्यानी व्यक्त केले. काही तासात रुग्णांचा मृत्यू होणे ही निश्चित दुर्दैवाची बाब आहे. मात्र या घटनेनंतरही अनेक रुग्णांनी या रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय घेतला आणि उपचारही घेतले. अनेक रुग्णांची त्याच दिवशी शस्त्रक्रिया देखील पार पडली. नागरिकांचा गेली अनेक वर्ष या रुग्णालयावर विश्वास आहे. याचा देखील विचार करायला हवा. मात्र सध्या असे होताना दिसत नाही. काही जणांकडून या दुर्घटनेचे अत्यंत वाईट राजकारण केले जात आहे. यामुळे रुग्णालयाचे नाव खराब होत आहे. मात्र हे रुग्णालय आजही अनेकांचा आधार आहे. सध्या रुग्णालयातील रुग्णांची आणि नातेवाईकांची चौकशी केली असता सर्व रुग्ण येथील उपचारांवर समाधानी असल्याचे सांगितले, असेही मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
हेही वाचा >>>कल्याणमध्ये आडिवलीतील नैसर्गिक स्त्रोत बुजविणारी बेकायदा इमारत भुईसपाट
रुग्णांचा मृत्यूवरही काही जणांकडून अत्यंत वाईट असे राजकारण केले जात आहे. सर्वसामान्य नागरिकांच्या मृत्यूवर राजकारण करणे म्हणजे मृताच्या टाळूवरचे लोणी खाण्याचा प्रकार आहे. जनता सुज्ञ आहे, जनता सर्व पाहत आहे, हे त्यांनी विसरू नये. सध्या राज्यात सर्व सामान्यांचे सरकार आहे. मात्र काहीजण वेड्यांचे राज्य म्हणत आहे. खर तर वेड्यांचे राज्य म्हणाऱ्यांना सत्ता गेल्यामुळे वेड लागले आहे. असे मुख्यमंत्री यावेळी विरोधकांना उत्तर देताना म्हणाले.
कळवा रूग्णालयात विविध अत्याधुनिक सुविधा मिळाव्यात, यासाठी राज्य सरकारकडून ६० कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे. तर मनोरुग्णालयात स्थलांतरित केलेल्या सिव्हिल रुग्णालयात अतिरिक्त १०० बेडची सुविधा उपलब्ध करण्याच्या सूचना दिल्या. तसेच कळवा आणि सिव्हिल रुग्णालयातील रुग्णांना रुग्णवाहिकांची सुविधा उपलब्ध करुन दिली जाणार असल्याचेही मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितले.