ठाणे : येत्या उद्या (गुरुवारी) येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड, मनसे नेते अविनाश जाधव हे उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. हे अर्ज दाखल करण्यापुर्वी तिन्ही पक्षांकडून शहरात मिरवणुका काढून जोरदार शक्तीप्रदर्शन केले जाणार आहे. आव्हाड यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राष्ट्रवादी (शरद पवार) या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे तर, अविनाश जाधव यांचा अर्ज भरण्यासाठी मनसे प्रमुख राज ठाकरे हे उपस्थित राहणार आहेत. यामुळे गुरूवारपासून ठाण्यातील मतदार संघांमध्ये प्रचाराची रणधुमाळी सुरू होणार असल्याचे चित्र आहे.
ठाणे महापालिका क्षेत्रातील कोपरी-पाचपखाडी मतदार संघातून मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे निवडणुक लढविणार असून त्यांच्याविरोधात महाविकास आघाडीकडून तुल्यबळ उमेदवार देण्याची तयारी सुरू आहे. या जागेची मागणी राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाने केली होती. परंतु शिवसेना (ठाकरे गट) या जागेसाठी आग्रही आहे. त्यामुळे महाविकास आघाडीच्या जागा वाटपात ही जागा कोणत्या पक्षाला मिळणार आणि उमेदवार कोण असणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. असे असतानाच गुरुवार, २४ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे उमेदवारी अर्ज दाखल करून प्रचाराला सुरूवात करणार आहेत. अर्ज भरण्यापुर्वी त्यांच्याकडून मिरवणुक काढली जाणार असून त्यात ते शक्ती प्रदर्शन करणार असल्याचे समजते.
हेही वाचा >>>दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील फडके रोड गुरूवार, शुक्रवार वाहतुकीसाठी बंद
कल्याण ग्रामीणमधील मनसेचे आमदार प्रमोद (राजू) पाटील यांच्या जनसंपर्क कार्यालयाच्या उदघाटनासाठी सोमवारी मनसे प्रमुख राज ठाकरे हे कल्याण ग्रामीण भागात आले होते. त्यावेळी त्यांनी कल्याण ग्रामीणमधून प्रमोद पाटील यांची तर, ठाणे शहरातून अविनाश जाधव यांची उमेदवारी घोषित केली. अविनाश जाधव हे सुद्धा गुरुवार, २४ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी काढण्यात येणाऱ्या मिरवणुकीत शक्ती प्रदर्शन करण्यात येणार आहे. तसेच जाधव यांचा अर्ज दाखल करण्यासाठी राज ठाकरे हे ठाण्यात येणार आहेत. कळवा-मुंब्रा विधानसभा मतदार संघातून राष्ट्रवादी (शरद पवार गट) चे नेते जितेंद्र आव्हाड हे चौथ्यांदा निवडणुक लढविणार आहेत. ते सुद्धा गुरुवार, २४ ऑक्टोंबर रोजी येणाऱ्या गुरुपुष्यामृत योग साधत उमेदवारी अर्ज दाखल करणार असून यावेळी त्यांच्या पक्षाचे अध्यक्ष शरद पवार हे उपस्थित राहणार आहेत. अर्ज दाखल करण्यासाठी आव्हाड हे मुंब्रा भागात मिरवणुक काढून शक्ती प्रर्दशन करणार आहेत.
हेही वाचा >>>दिवाळी पहाट कार्यक्रमानिमित्त डोंबिवलीतील फडके रोड गुरूवार, शुक्रवार वाहतुकीसाठी बंद
ठाणे शहर विधानसभा मतदार संघातून तिसऱ्यांदा उमेदवारी मिळालेले भाजपचे आमदार संजय केळकर हे वसुबारसचा मुहूर्त साधत सोमवार, २८ ऑक्टोबर रोजी सकाळी ११.३० वाजता उमेदवारी अर्ज दाखल करणार आहेत. या पुर्वी ते मिरवणुक काढून शक्तीप्रदर्शन करणार आहेत. असे असले तरी त्यांनी मंगळवारी दमाणी इस्टेटमधील दत्त मंदिरात दर्शन घेऊन प्रचाराला सुरूवात केली आहे. भाजपा घर चलो अभियानांच्या माध्यमातून प्रचार सुरू केला असून यामध्ये ४०० बुथवरील पदाधिकारी घरोघरी जाऊन केळकर यांची माहिती पत्रकांचे वाटप करणार आहेत.
गुरुवार, २४ ऑक्टोबर रोजी चंद्र संपूर्ण दिवस-रात्र पुष्य नक्षत्रात रहाणार असल्याने दुर्मिळ असा ‘ गुरुपुष्यामृत योग ‘ आला आहे. या दिवशी सकाळी सूर्योदयापासून ( सकाळी ६.३७ ) दुसऱ्या दिवशी सूर्योदयापर्यंत ( शुक्रवारी सकाळी ६.३७ ) हा योग आहे. गुरुपुष्यामृत योगावर सोने खरेदी करण्याची प्रथा आहे. मौल्यवान वस्तू खरेदी करण्याची परंपरा आहे. तसेच चांगल्या कामांचा प्रारंभ या दिवशी करण्याची प्रथा आहे, असे पंचांगकर्ते , खगोल अभ्यासक दा.कृ.सोमण यानी सांगितले.