ठाणे : केंद्र आणि राज्य शासनाकडून ठाणे शहरातील विकासकामांसाठी निधी दिली जात असून हा जनतेचा पैसा आहे. या पैशातून गुणवत्तापुर्ण कामे करून जनतेला चांगल्या सोयी-सुविधा मिळायला हव्यात. त्यात कोणत्याही अधिकाऱ्याला हलगर्जीपणा करता येणार नाही आणि तसे केले तर संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करा, असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांना ठाण्यातील विविध प्रकल्प लोकार्पण कार्यक्रमात बोलताना दिले. तसेच क्लस्टर योजनेतील सर्वच अडथळे दूर झाल्याने आता सगळी पथके लावून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा, अशी सुचनाही त्यांनी यावेळी केली.
हेही वाचा >>>ठाणे : सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत असल्याचा आनंद; राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांची प्रतिक्रिया
मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत विविध विकासकामांचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते लोकार्पण आणि भूमिपूजन शनिवारी करण्यात आले. मुख्यमंत्र्यांचे बदलते ठाणे या उपक्रमांतर्गत केंद्र सरकार, राज्य सरकार, ठाणे महापालिका, ठाणे स्मार्ट सिटी यांच्या संयुक्त विद्यमाने शहरात विविध विकास कामे करण्यात आली आहेत. त्यात कोपरी मीठबंदर येथील खाडी सुशोभीकरण, गावदेवी भूमीगत वाहनतळ, कळवा खाडी सुशोभीकरण, छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय येथील प्रसूती कक्ष आणि शस्त्रक्रिया विभाग, ज्ञानसाधना महाविद्यालय येथील उद्यान, परिवहन सेवेच्या विजेवरील बसगाड्या, नव्याने तयार करण्यात आलेले वाहतूक बेट आणि रस्ते मजबुतीकरण महत्वाकांक्षी प्रकल्पाचा समावेश आहे. प्रकल्प लोकार्पणानंतर किसननगर येथील रस्ता क्रमांक २२ येथे झालेल्या कार्यक्रमात बोलताना मुख्यमंत्री शिंदे यांनी कामात हलगर्जीपणा करणाऱ्या अधिकाऱ्यांना खडेबोल सुनावले. राज्य शासन चांगले निर्णय घेत आहे आणि मोठ्या प्रमाणावर निधी देत आहे. त्यामुळे जे प्रकल्प किंवा रस्ते कामे होत आहेत, ती चांगल्या दर्जाची झाली पाहीजेत. त्यात कोणी कसूर करत असेल तर आयुक्तांनी कोणाचाही मुलायजा ठेवू नये. हे लोकांचे सरकार असल्याने सर्वसामान्य माणूसच आमचा केंद्रबिंदू आहे. त्यामुळे त्यांच्या सोयी सुविधांमध्ये कुठल्याही अधिकाऱ्याला हलगर्जीपणा करता येणार नाही आणि हलगर्जीपणा खपवून घेतला जाणार नाही, हे प्रत्येक अधिकाऱ्याने लक्षात ठेवावे, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये डाॅक्टर चांगले काम करीत आहेत. पण, रुग्णांना सेवा देणाऱ्या डाॅक्टरांच्या वसतीगृहाची परिस्थिती चांगली नाही. यासाठी जे जबाबदार अधिकारी आहेत, त्यांच्यावर कठोर कारवाई करा, असे आदेशही त्यांनी यावेळी आयुक्तांना दिले. शहर मला काय देतेय, यापेक्षा मी शहराला काय देणार या भावनेतून अधिकाऱ्यांनी कामे करावीत, असा सल्लाही त्यांनी यावेळी दिला. ठाणे महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी नवी मुंबई शहराचा विकास केला असून त्याचधर्तीवर ठाणे शहराचा विकास करण्यासाठी त्यांनी पायाला भिंगरी लावून सर्व अधिकारी आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन कामाला सुरुवात केली आहे. ते दृश्य स्वरुपात आता दिसून लागले आहे, असे कौतुकही त्यांनी यावेळी केले.
हेही वाचा >>>ठाणे : मुख्यमंत्र्यांच्या दबावाखाली पोलीस काम करत आहेत; आनंद परांजपे यांचा गंभीर आरोप
क्लस्टर योजना
क्लस्टर योजनेसाठी राज्य शासनाकडून मोकळे भुखंड उपलब्ध करून दिले जाणार असून तिथेच इमारती उभारण्यात येणार आहेत. त्यामुळे संक्रमण शिबीरांऐवजी नागरिकांना थेट घरेच दिली जाणार आहेत, असे सांगत या योजनेबाबत कोणी दिशाभुल करण्याबरोबरच अफवा पसरवित असेल तर त्यावर विश्वास ठेवू नका. तुमचा मुख्यमंत्री असल्यामुळे कोणतीही चिंता करू नका, असे आवाहन त्यांनी नागरिकांना केले. क्लस्टर योजनेतील सर्वच अडथळे दूर झाल्याने आता सगळी पथके लावून प्रत्यक्ष कामाला सुरुवात करा, अशी सुचनाही त्यांनी आयुक्तांना यावेळी केल्या.
मुख्यमंत्र्यांच्या भेटीनंतर उपोषण मागे
कोपरी येथील सिद्धार्थ नगर भागातील झोपडपट्टी मधील रहिवाशांनी आपल्या हक्कांच्या घरांसाठी मागील काही दिवसापासून उपोषण सुरू केले होते. शनिवारी प्रकल्प लोकपर्ण कार्यक्रमादरम्यान मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेतली. त्यांची बाजू ऐकून घेऊन त्यांच्या घरांचा प्रश्न लवकरच सोडायला जाईल, असे आश्वासन त्यांनी दिल्यानंतर रहिवाशांनी उपोषण मागे घेतले.
जितेंद्र आव्हाड काय म्हणाले
सन २०१७ साली मिलिंद पाटील हे विरोधी पक्षनेते असताना कळवा खाडीकिनारी सुशोभिकरण प्रकल्पाच्या संचालक मंडळात असल्याकारणाने कळव्यासाठी हा प्रकल्प मंजूर झाला होता. हे काम बऱ्याच दिवसांपूर्वी पूर्ण झाले होते. सगळ्या नगरसेवकांनी बैठक घेऊन याचे उदघाटन देखील करण्याचे ठरवले होते. पण, मिलिंद पाटील आजारी असल्याने उदघाटन करता आले नाही. मला या गोष्टीचा आनंद आहे की, या सुंदर कामाचे उदघाटन मुख्यमंत्री करीत आहेत. फक्त जनतेच्या माहितीसाठी की कळव्यातील कामे कशी व्यवस्थित होत आहेत आणि त्याचाच आम्हांला आनंद आहे, अशी प्रतिक्रिया राष्ट्रवादीचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी समाज माध्यमांद्वारे व्यक्त केली आहे.